Gujarat Cow Abuse Case: गुजरातमध्ये दोन वर्षांच्या गायीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करत एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गायीला मारहाण केल्याचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. आरोपीचे नाव कानूभाई असल्याचे सांगितले जात आहे.

इंडिया टुडेने या संदर्भात बातमी दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ही गाय मेरखीभाई चावडा यांच्या गोठ्यातील होती. एकेदिवशी गोठ्यातून बाहेर पडल्यानंतर गाय भरकटत इतर ठिकाणी गेली. तेव्हा ही घटना घडल्याचा आरोप चावडा यांनी केला. चावडा म्हणाले की, गायीचा शोध घेत असताना मी एका स्मशानभूमीजवळील परिसरात पोहोचलो. तिथे कानूभाई गायीबरोबर आक्षेपार्ह कृत्य करताना आपण पाहिले, असा दावा त्यांनी केला.

गायीच्या मालकाला पाहून कथित आरोपी घटनास्थळावरून पळून गेल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी सांगितले की, घटनास्थळी उपस्थित असलेल्या दुसऱ्या एका स्थानिक रहिवाशाने ही घटना त्याच्या मोबाइलमध्ये चित्रित केली. यानंतर चावडा यांनी पोलिसांना याची माहिती देऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी कथित आरोपीला ताब्यात घेऊन प्राणी ‘प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, १९६०’ कायद्याच्या कलम ११(१)(अ) नुसार गुन्हा दाखल करत आरोपीला ताब्यात घेतले.

हिमाचल प्रदेशमध्येही अत्याचाराची घटना

४ सप्टेंबर रोजी हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथेही असेच एक प्रकरण समोर आले होते. याही प्रकरणात गायीच्या मालकाने लैंगिक अत्याचार करत असताना आरोपीला पाहिले होते. त्यानंतर आरोपी फरार झाला. पोलिसांनी त्याला पंजाबमधील पठाणकोट रेल्वे स्टेशनजवळून अटक केली. पोलिसांनी सांगितले की, जोगिंदर कुमार यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. यानंतर फरार झालेल्या नरेश (वय ३५) नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली. तो मुळचा राजस्थानचा असल्याचे सांगितले जाते.

नरेश याच परिसरात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बांधकाम मजूर म्हणून काम करत होता. गावातील एका स्थानिक महिलेने त्याला गायीबरोबर पाहिल्यानंतर हॉटेलचे मालक असलेल्या पतीला याची माहिती दिली. यानंतर पतीने गायीच्या मालकाला याची माहिती दिली आणि सदर प्रकार समोर आला.

बंगळुरूमध्येही डिलिव्हरी बॉयचा अत्याचार

बंगळुरू शहरात मे २०२६ मध्ये एका डिलिव्हरी कर्मचाऱ्याला अशाच प्रकारच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली होती. ५ मे रोजी सदर घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. मध्यरात्री १ वाजून ४७ मिनिटांनी डिलिव्हरी कर्मचारी दुचाकीवरून जात असताना रस्त्याच्या कडेला बसलेल्या गायीला पाहून तिथे थांबतो. रस्ता निर्मनुष्य होईपर्यंत तो वाट पाहतो. त्यानंतर विकृत कृत्य करून तो घटनास्थळावरून पळून जातो.

बंगळुरूच्या कॉटनपेट पोलीस ठाण्याच्या निगराणी आणि देखरेख पथकाने फुटेजची पडताळणी केल्यानंतर सदर आरोपीला अटक करण्यात आली होती. पोलिसांनी सांगितले की, आलम नावाच्या आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली.