Gujarat ATS: गुजरातमधील दहशतवादी विरोधी पथकाने भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजांची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरविणाऱ्या एका कंत्राटी कामगाराला अटक केली आहे. दीपेश गोहिल नामक आरोपी केवळ २०० रुपयांच्या बदल्यात पाकिस्तानाला तटरक्षक दलाच्या जहाजांबाबत महत्त्वाची माहिती पुरवत होता. दीपेशला पाकिस्तानी गुप्तहेरांकडून प्रतिदिन २०० रुपये दिले जात होते. आतापर्यंत त्याला एकूण ४२ हजार रुपये मिळाल्याचे सांगितले जात आहे. ओखा बंदरात काम करत असलेल्या दीपेश फेसबुकच्या माध्यमातून पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात आला होता.
पाकिस्तानी गुप्तहेराने साहिमा या टोपण नावाने दीपेशशी फेसबुकवर मैत्री केली होती. त्यानंतर व्हॉट्सॲपच्या माध्यमातूनही ते संपर्कात होते. ओखा बंदरात येणाऱ्या भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजांचे नाव आणि नंबर पाकिस्तानी गुप्तहेराला पुरविण्याचे काम दीपेशकडून केले जात होते. दीपेशला अटक केल्यानंतर अद्याप पाकिस्तानी एजंटचे खरे नाव समोर आलेले नाही.
हे ही वाचा >> “EVM सेट होऊ शकतं, याचं प्रेझेंटेशन आम्हाला मिळालं होतं, पण…”, ईव्हीएमबाबत शरद पवारांचं मोठं विधान
गुजरात दहशतवादी विरोधी पथकाचे अधिकारी के. सिद्धार्थ म्हणाले, “पाकिस्तानी नौदल अधिकाऱ्यांना ओखा बंदरातून एक माणूस तटरक्षक दलाच्या जहाजांची गोपनीय माहिती पुरवत असल्याचे आम्हाला समजले. तपास केल्यानंतर आम्ही दीपेश गोहिलला अटक केली. दीपेश ज्या नंबरवर माहिती पाठवत होता, तो पाकिस्तानमधील असल्याचे समोर आले आहे.” ज्याठिकाणी तटरक्षक दलाच्या बोटी उभ्या केल्या जात होत्या, त्या परिसरात दीपेश गोहिलला प्रवेश होता, अशीही माहिती दहशतवादी विरोधी पथकाने दिली आहे.
प्रतिदिन २०० रुपये मिळत होते
पाकिस्तानी गुप्तहेराला माहिती पुरविण्याच्या बदल्यात दीपेश गोहिलला प्रतिदिन २०० रुपये मिळत होते. मात्र त्याचे स्वतःचे बँक खाते नसल्यामुळे तो मित्राच्या खात्यावर पैसे मागवून घेत होता. त्यानंतर तो मित्राकडून रोखीत पैसे घ्यायचा. वेल्डिंगचे काम केल्याचे हे पैसे आहेत, असे कारण दीपेशने मित्राला सांगितले होते. आतापर्यंत पाकिस्तानी गुप्तहेराकडून दीपेशला ४२ हजार रुपये मिळाले आहेत.
के. सिद्धार्थ यांनी पुढे सांगितले की, पाकिस्तानी नौदलाचे अधिकारी किंवा आयएसआय एजंट हे भारतीय तटरक्षक दलाची माहिती पुरविणाऱ्यांचा शोध घेत असतात. गुजरात एटीएस आणि तटरक्षक दलाने एकत्र काम करत अंमली पदार्थांची तस्करी उघड केली होती. यासाठी तटरक्षक दलाच्या बोटींची माहिती पाकिस्तान आणि आयएसआयसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचल्यास तटरक्षक दलासाठी धोका निर्माण होऊ शकतो.