गुजरातमधील एका व्यक्तीने इच्छामरणासाठी प्रशासनाकडे अर्ज केला. पत्नीकडून होणारा छळ आणि आपल्या तक्रारींवर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे असा अर्ज केल्याचा दावा या व्यक्तीने केला आहे.दीर्घकाळ चाललेले कायदेशीर वाद आणि वैयक्तिक त्रासामुळे आपले जीवन संपवण्याची परवानगी मागण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय उरलेला नाही, असा आरोप पटेल यांनी केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
सुरतचे रहिवासी असलेल्या किरीट पटेल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे हा अर्ज दाखल केला असून, त्यांची पत्नी कौटुंबिक वादानंतर त्यांच्याविरुद्ध तक्रारी दाखल करून महिलांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्यांचा वारंवार गैरवापर करत आहे. त्यांचे सध्याचे लग्न १४ नोव्हेंबर २०२४ रोजी झाले. त्यांनी असा आरोप केला की, त्यांची पत्नी, सासू आणि इतर नातेवाईकांनी पैशांसाठी त्यांच्यावर वारंवार दबाव टाकला आणि त्यांचा छळ केला. त्यांनी असाही दावा केला की, त्यांच्यावर दाखल केलेल्या पोटगी आणि घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणांचा वापर दबाव टाकण्यासाठी केला जात आहे.
पटेल यांच्या म्हणण्यानुसार, पत्नी मुद्दामहून वाद निर्माण करायची आणि नंतर पोलीस किंवा महिला हेल्पलाइनशी संपर्क साधायची, ज्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली व्हायची. या आरोपांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली नाही. या बाबतचे वृत्त इंडिया टुडे ने प्रसिद्ध केले आहे.
पटेल यांनी केलेल्या सर्वात गंभीर आरोपांपैकी एक आरोप म्हणजे, त्यांच्या पहिल्या लग्नापासून झालेल्या मुलाशी संबंधित आहे. त्यांनी असा आरोप केला आहे की, त्यांच्या पत्नीने मुलाला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता आणि पोलिसांकडे तक्रार करूनही या संदर्भात कोणतीही एफआयआर नोंदवण्यात आली नाही. पटेल म्हणाले की, त्यांनी या प्रकरणाची चौकशी करून योग्य कारवाई करण्याची अधिकाऱ्यांना वारंवार विनंती केली होती परंतु काही झाले नाही.
या जोडप्याचा वैवाहिक इतिहासही चर्चेचा विषय बनला आहे. पटेल यांनी सांगितले की, त्यांचे आणि त्यांच्या पत्नीचे हे तिसरे लग्न आहे. त्यांनी आपल्या पत्नीला ‘लुटारू वधू’ असे संबोधले आणि आरोप केला की, पैसे किंवा मौल्यवान वस्तू मिळाल्यानंतर लग्न सोडून देण्याऐवजी, ती पतींना लक्ष्य करण्यासाठी कायदेशीर कारवाई आणि आर्थिक मागण्यांचा वापर करते. तसेच त्यांनी पुढे असाही दावा केला की, त्यांच्या पत्नीने पूर्वीच्या पतींकडूनही पैसे उकळले होते; हे आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत.
पटेल इच्छामरणासाठी इतके का आतुर आहेत?
आपल्या इच्छामरणाच्या अर्जात, पटेल यांनी कौटुंबिक वादांना सामोरे जाणाऱ्या पुरुषांना कायदेशीर संरक्षणाचा अभाव असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी लिहिले आहे की, पोलीस ठाण्यांना आणि सरकारी कार्यालयांना वारंवार भेटी देऊनही केवळ आश्वासने मिळाली आणि कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. सुरत जिल्हाधिकारी कार्यालयाचा पावती शिक्का असलेल्या या अर्जात, या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा दुसरा कोणताही मार्ग दिसत नसल्याचे सांगून, इच्छामरणासाठी परवानगी त्यांनी मागितली आहे.
पटेल यांनी असा इशाराही दिला आहे की, जर ठराविक कालावधीत त्यांच्या तक्रारींचे निवारण झाले नाही, तर ते टोकाचे पाऊल उचलू शकतात. अधिकाऱ्यांनी अद्याप या आरोपांवर किंवा इच्छामरणाच्या विनंतीवर अधिकृत प्रतिसाद दिलेला नाही.
या प्रकरणामुळे मानसिक आरोग्य, वैवाहिक विवादांमध्ये पुरुषांना उपलब्ध असलेले कायदेशीर संरक्षण आणि कौटुंबिक संघर्षांशी संबंधित तक्रारी हाताळण्याच्या पद्धतींवर चर्चा सुरू झाली आहे.
