Gujarat Crime News : गुजरातमधील आनंद जिल्ह्यातील संभाल या गावात ऑक्टोबर २०१९ मध्ये सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणातील आरोपीला संभाल सत्र न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. आरोपी अर्जुन उर्फ दादो गोहेल याला पॉक्सो कायद्यांतर्गत बलात्कार व हत्येप्रकरणी दोषी ठरवत दुहेरी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. पॉक्सो आणि हत्या अशा दोन गुन्ह्यांप्रकरणी आरोपी अर्जुन गोहेल याला दुहेरी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गुजरातमधील न्यायालयाने एखाद्या गुन्हेगारास दुहेरी मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावल्याची ही पहिलीच घटना आहे.

आता आरोपीला फाशीच्या शिक्षेपासून वाचण्यासाठी पॉक्सो व हत्येच्या दोन प्रकरणांमध्ये वेगवेगळ्या याचिका दाखल कराव्या लागतील. २८ ऑक्टोबर २०१९ रोजी आरोपीने सात वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिचा खून केला होता. अर्जुन गोहेलने त्याच्याच गावात राहणाऱ्या एका मुलीला चॉकलेटचं अमिष दाखवलं आणि तिला घरात घेऊन गेला. त्यानंतर गोहेलने तिच्यावर बलात्कार केला आणि तिची गळा दाबून हत्या केली होती

गुजरातमध्ये अशा प्रकारचे गुन्हे सहन केले जाणार नाहीत : गृहराज्यमंत्री

संभाल सत्र न्यायालयाने आरोपीला दुहेरी मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावल्यानंतर गुजरातचे गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “न्यायालयाने न्याय दिला. आनंद जिल्ह्यातील सात वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या अर्जुन गोहेल याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. हा योग्य निर्णय आहे. हा पीडितेच्या कुटुंबाचं सांत्वन करणारा निकाल आहे. न्यायालयाचा हा निकाल म्हणजे गुन्हेगारांना स्पष्ट संदेश आहे की गुजरातमध्ये अशा प्रकारचे गुन्हे सहन केले जाणार नाहीत. अशा गंभीर गुन्हेगारांना मृत्यूदंड होईल.

त्या घटनेमुळे लोक मुलींना घराबाहेर पाठवायला घाबरत आहेत : सरकारी वकील

विशेष सरकारी वकील रघूवीर पांड्या म्हणाले, “आम्ही न्यायालयात विशेष याचिका दाखल केली होती. गुजराती नववर्षाचा तो दिवस होता, ती मुलगी अंगणात खेळत होती. त्याच वेळी जवळच राहणारा २९ वर्षीय आरोपी तिथे आला आणि चॉकलेटचं लालच देऊन त्या चिमुरड्या मुलीला तिथून घेऊन गेला. त्यानंतर आरोपीने तिच्यावर बलात्कार करून तिचा गळा दाबून ठार केलं. या घटनेमुळे पालकांच्या मनात इतकी भीती निर्माण झाली आहे की ते आता आपल्या मुलींना बाहेर खेळायला पाठवण्यास घाबरत आहेत. याचं गांभीर्य न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत आम्ही आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती.”

आरोपीला दुहेरी मृत्यूदंडाची शिक्षा

रघूवीर पांड्या म्हणाले, आरोपीचे गंभीर गुन्हे व त्याचा तुरुंगातील वाईट व्यवहार पाहून आम्ही त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली होती. तसेच घटना घडली त्याआधी पीडितेबरोबर खेळणाऱ्या मुलींची साक्ष, आरोपी जेव्हा मुलीला घेऊन जात होता तेव्हा इतर काही लोकांनी त्याला पाहिलं होतं. त्यांची साक्ष देखील घेण्यात आली. तसेच पोलिसांनी सादर कलेले पुरावे पाहून न्यायालयाने आरोपीला दुहेरी मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे.