CPR to Snake Rescue viral video Gujarat: गुजरातच्या वापी येथील औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्यात रासायनिक सांडपाण्याच्या टाकीत पडून बेशुद्ध झालेल्या सुमारे पाच फूट लांबीच्या सापाला सर्पमित्राने कृत्रिम श्वासोच्छवास (सीपीआर) देऊन वाचवले. सुमारे दोन मिनिटे चाललेल्या या अथक प्रयत्नांनंतर सापाने प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आणि अखेर त्याचा जीव वाचला. या बचाव कार्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वलसाड जिल्ह्यातील वापी जीआयडीसीच्या पहिल्या टप्प्यात असलेल्या ‘इंडिया जिलेटीन कंपनी लिमिटेड’च्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रात (ईटीपी) शुक्रवारी ही घटना घडली. टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या माहितीने दिलेल्या वृत्तानुसार, हा साप कारखान्याच्या आवारात आला असताना अचानक विषारी रसायन असलेल्या पाण्याच्या टाकीत पडला. रासायनिक पाण्याच्या संपर्कात आल्याने आणि ते पाणी पोटात गेल्यामुळे साप पाण्याच्या पृष्ठभागावर निपचित पडून बेशुद्ध झाला होता.
दोन मिनिटं दिला सीपीआर
हा प्रकार कामगारांच्या लक्षात आल्यानंतर कंपनी प्रशासनाने तातडीने सर्पमित्र आणि वन्यजीव रक्षक संजय पवार यांच्याशी संपर्क साधला. पवार यांनी घटनास्थळी धाव घेत सापाला टाकीतून सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यावेळी सापाच्या शरीरात कोणतीही हालचाल जाणवत नव्हती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पवार यांनी विलंब न करता सापाला कृत्रिम श्वासोच्छवास देण्यास सुरुवात केली. साधारण दोन मिनिटांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर सापाच्या शरीरात हालचाल सुरू झाली आणि तो शुद्धीवर आला.
काही काळ देखरेखीखाली ठेवल्यानंतर या सापाला नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले. दरम्यान, विषारी रासायनिक पाण्याच्या थेट संपर्कात आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून संजय पवार यांनाही वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
इंसानों को CPR दिया जाता है।
— Pooja Rakesh (@PoojaRK07) September 20, 2026
लेकिन सांप को?????
संजय कुमार हैं। वापी गुजरात से।
एक फैक्ट्री में सांप घुस गया। केमिकल के कारण वो अचेत हो गया।
फ़िर संजय कुमार देने लगे सांप को CPR…
जो हुआ I Can't believe…..Watch…. pic.twitter.com/313mKMZqMp
हा साप नेमका कोणत्या प्रजातीचा होता, याबाबत स्थानिक पातळीवर मतप्रवाह आहेत. काही नोंदींनुसार तो बिनविषारी धामण जातीचा असल्याचे सांगण्यात येत आहे, तर काहींनी तो विषारी साप असल्याचा दावा केला आहे.
एकाच दिवशी दोन नागही सुरक्षित ताब्यात
दरम्यान याच दिवशी पवार आणि त्यांच्या पथकाने वापी परिसरातून आणखी दोन कोब्रा जातीच्या विषारी नागांची सुटका केली. त्यातील एका नागाला चलना भाथला पार्टी प्लॉटजवळील मोकळ्या जागेतून, तर दुसऱ्या नागाला दमण गंगा इंडस्ट्रियल पार्क परिसरातील एका कंपनीच्या आवारातून सुरक्षितपणे पकडण्यात आले.
औद्योगिक वसाहतींलगत नैसर्गिक अधिवास असल्याने या भागात सरपटणारे प्राणी शिरण्याच्या घटना वारंवार घडत असतात. मात्र, अशा प्रसंगी नागरिकांनी स्वतःहून सापाला पकडण्याचा किंवा हाताळण्याचा धोका पत्करू नये; तातडीने प्रशिक्षित सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वन्यजीव अभ्यासकांनी केले आहे.
