जवळपास १५ वर्षांपासून रुग्ण डॉक्टर समजून ज्याच्याकडे उपचारासाठी जात होते, तो व्यक्ती प्रत्यक्षात केवळ दहावीपर्यंत शिकलेला असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. वडोदरा शहरातील अकोटा परिसरात ‘प्रमिला क्लिनिक’ चालवणाऱ्या ४५ वर्षीय बिस्वजीत प्रफुल्ल हलदारला पोलिसांनी बुधवारी अटक केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हलदारकडे वैध वैद्यकीय पदवी किंवा नोंदणी नसतानाही तो स्वतःला डॉक्टर म्हणून भासवत होता आणि रुग्णांवर उपचार करत होता. याबद्दल वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

औषधांचा परिणाम होत नसल्याने संशय

हलदारकडे उपचार घेणाऱ्या काही रुग्णांना त्याने दिलेल्या औषधांचा परिणाम होत नसल्याचे जाणवू लागले. त्यानंतर परिसरात त्याच्याबद्दल चर्चा सुरू झाली आणि पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. वडोदरा शहर पोलिसांच्या झोन-२ स्थानिक गुन्हे शाखेने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्याच्या क्लिनिकवर छापा टाकला. यावेळी तो अ‍ॅलोपॅथिक औषधे लिहून देणे, इंजेक्शन देणे तसेच मूळव्याधीवर शस्त्रक्रिया करत असल्याचे आढळल्याचा पोलिसांचा दावा आहे.

पोलिसांनी क्लिनिकमधून मोठ्या प्रमाणात औषधे आणि वैद्यकीय साहित्य जप्त केले. त्यात सुमारे ४१ हजार रुपयांच्या किमतीच्या कफ सिरपच्या ३८ बाटल्या, १६२ इंजेक्शन्स, २८१ औषधांच्या स्ट्रिप्स, ८४ ट्यूब, ३० पावडर स्वरूपातील औषधे, ३२ कॅप्सूल, ९ आयवी फ्लुइडच्या बाटल्या, १९ इन्फ्युजन सेट यांचा समावेश आहे.

गरम चिमट्याने मूळव्याधीवर उपचार केल्याचा आरोप

पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार, हलदारने बनावट बीआयएएमएस (बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी) पदवीचे प्रमाणपत्र वापरून स्वतःला पात्र डॉक्टर म्हणून सादर केले. तो मूळव्याध आणि हेमोरॉइड्सवरील उपचारांसाठी गरम केलेल्या चिमट्याचा वापर करून शस्त्रक्रियेसारखी प्रक्रिया करत असल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, ही प्रक्रिया भूल न देता केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. या उपचारासाठी रुग्णांकडून २५ हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारले जात असल्याचाही दावा आहे.

वडोदरा शहराच्या झोन-२च्या डीसीपी मंजिता वंझारा यांनी सांगितले की, हलदारकडे दररोज मोठ्या संख्येने रुग्ण येत होते आणि काही प्रत्यक्ष डॉक्टरांपेक्षाही तो अधिक कमाई करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

आधी डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये हेल्पर म्हणून काम

पोलिसांच्या तपासात हलदारने यापूर्वी पश्चिम बंगालमधील एका डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये हेल्पर म्हणून काम केल्याचे समोर आले आहे. सुमारे १५ वर्षांपूर्वी तो वडोदऱ्यात आला आणि त्यानंतर अकोटा परिसरात स्वतःचे क्लिनिक सुरू करून डॉक्टर असल्याचे भासवू लागल्याचा आरोप आहे.

पोलिसांच्या मते, त्या डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये काम करताना त्याने काही सामान्य औषधे आणि उपचारपद्धतींबाबत माहिती मिळवली असण्याची शक्यता आहे. “त्याने केवळ दहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. तो येथे एकटाच राहत होता आणि त्याच्याकडे प्रामुख्याने निम्न मध्यमवर्गीय रुग्ण उपचारासाठी येत होते. एवढ्या वर्षांत त्याच्या प्रमाणपत्रांची कोणीही तपासणी केली नसल्याचे दिसते,” असे डीसीपी वंझारा यांनी सांगितले.

किती रुग्णांवर उपचार केले, याचा तपास

आता पोलिसांकडून त्याने एकूण किती रुग्णांवर उपचार केले, कोणती औषधे आणि इंजेक्शन्स दिली, किती व्यवसाय केला आणि त्यातून किती कमाई केली, याचा तपास सुरू आहे. तसेच या बेकायदा व्यवसायातून मिळालेल्या पैशांबाबतही पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी तपास केला जात आहे. हलदारला अटक करण्यात आली असून कायद्यानुसार त्याला जामीन मिळाला आहे.