गुजरातमधील वास्तुरचनाकार महिलेवर २००९ मध्ये पाळत ठेवल्याप्रकरणी गुजरात सरकारच्या विरोधात निलंबित सनदी अधिकारी प्रदीप शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याची सुनावणी डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात होणार आहे. काही गंभीर बाबी उजेडात आल्यानंतर सरन्यायाधीश पी.सतशिवम यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने या प्रकरणी सविस्तर सुनावणी निश्चित केल्याचे शर्मा यांचे वकील प्रशांत भूषण यांनी सांगितले.
गुजरातचे माजी मंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार महिलेवर पाळत ठेवल्याचे उघड झाल्याचे भूषण यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी व्हावी यासाठी आपण या आठवडय़ाअखेरीस अर्ज करणार असल्याचे भूषण यांनी स्पष्ट केले. ‘साहेबांच्या’ आदेशावरून अमित शहा महिलेवर पाळत ठेवत असल्याचे ‘कोब्रापोस्ट’ आणि ‘गुलैल’ या वृत्त संकेतस्थळांनी उघड केल्यानंतर खळबळ उडाली आहे.
शहा आणि भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी जी. एल. सिंघल यांच्यातील हा संवाद आहे. सिंघल यांना २००४च्या फेब्रुवारीत सीबीआयने मध्ये इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणात अटक केली होती. नंतर त्यांना जामीन मिळाला. पुढे गुजरात पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकात पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
श्रीकुमार यांचा मानहानीचा दावा
 दरम्यान,बनावट चकमकप्रकरणी माझ्या विरोधात कट रचल्याचा आणि मानहानी केल्याचा आरोप करत गुजरातचे माजी पोलीस महासंचालक आर. बी. श्रीकुमार यांनी गुजरातचे मुख्यमंत्री यांच्या नरेंद्र मोदी यांच्या विरोधात स्थानिक न्यायालयात खटला दाखला केला.

भाजपची टीका
या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीकडून चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी आश्चर्यकारक असल्याचे मत भाजप नेते व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार काँग्रेसने गमावल्याचे त्यांनी सांगितले.