Gujarat ST Bus Accident Update : गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील बारडोली येथील उवा गावाजवळ मंगळवारी भीषण अपघात झाला. महाराष्ट्रातील दोन एसटी बस आणि ट्रॅक्टरच्या या विचित्र अपघातात जवळपास ७ जणांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. तर, ३८ हून अधिक प्रवासी जखमी आहेत. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

सुरतहून धुळ्याकडे जाणाऱ्या एसटी बसला पाण्याच्या टँकरची धडक लागली. त्यामुळे या बसच्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ही बस दुभाजकाला जाऊन आदळली. दुभाजकाच्या पलीकडील मार्गावरून जळगाव-सुरत बस धावत होती. धुळे-सुरत बसची जळगाव बसला जोरात धडक लागली. यामुळे भीषण अपघात झाला. ही धडक इतकी भीषण होती की धुळे-सुरत बस दोनवेळा उलटली आणि मग बसने पेट घेतला.

ही आग इतकी प्रचंड होती की बसमधील प्रवाशांना बाहेर पडण्याचीही संधी मिळाली नाही. तसंच, बाहेरील लोकांनाही त्यांना बाहेर काढायला मिळाले नाही. परिणामी बसमधील ७ ते ८ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आगीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी जखमी प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.

अपघात इतका भीषण होता की वाहनांचे पूर्णपणे नुकसान झाले. बसमध्ये अडकलेल्या लोकांना आणि भाजलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या बचाव पथकाला गॅस कटरचा वापर करावा लागला.

महामार्गावर नेमकं काय घडलं?

सुरत ग्रामीणचे इनस्पेक्टर जनरल ऑफ पोलीस प्रेमवीर सिंग म्हणाले, “राष्ट्रीय महामार्ग ५६ वर, बारडोलीकडून व्याराकडे जाणाऱ्या रस्त्यावर महाराष्ट्र पासिंग असलेल्या दोन प्रवासी बसेसची समोरासमोर धडक झाली. या अपघातामुळे एका बसला आग लागली, तर दुसऱ्या बसमधील प्रवासी जखमी झाले. यात सात जणांचा मृत्यू झाला असून ३८ जण जखमी झाले आहेत. जखमींना बारडोली येथील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. बसेसमध्ये इतर किती लोक प्रवास करत होते, याचा शोध घेण्यासाठी सध्या तपास सुरू आहे. रस्त्यावरून पुढे एक पाण्याचा टँकर चालला होता. एक बस मागून या टँकरला धडकली. त्यामुळे बस चालकाचे नियंत्रण सुटले; बस दुभाजक (डिव्हायडर) ओलांडून पलीकडे गेली आणि समोरून येणाऱ्या दुसऱ्या बसला धडकली. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.”

दरम्यान या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला. तसंच, मृतांच्या नातेवाईकांसाठी मदतनिधीही जाहीर केला आहे.

“गुजरातच्या सुरत जिल्ह्यात झालेल्या अपघाताबद्दल ऐकून मला खूप दुःख झाले आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. अपघातस्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. प्रशासन सर्वतोपरी मदत करत आहे.” पंतप्रधानांनी पीडितांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.