एका व्यक्तीच्या आत्महत्येच्या तपासातून तब्बल सहा महिन्यांपूर्वी झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा असा काही उलगडा झाला आहे की, ज्यामुळे संपूर्ण गुजरात हादरून गेले आहे. पती गिरिश परमार याने स्वतःच्या पत्नीची आणि एका लहान मुलीची हत्या करून त्यांचे मृतदेह चक्क राहत्या घरातच पुरल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
नेमकी घटना काय?
वडनगर येथील एका सिव्हिल हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून गिरिश परमार नावाच्या व्यक्तीने आत्महत्या केली. सुरुवातीला पोलिसांना ही एक साधी आत्महत्येची घटना वाटली होती. मात्र, गिरिशच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या एका ‘सुसाईड नोट’ने पोलिस चक्रावले. या चिठ्ठीत त्याने कबुली दिली होती की, सहा महिन्यांपूर्वी त्याने पत्नी प्रियांका आणि मुलगी परी यांची हत्या करून त्यांचे मृतदेह घरातच पुरले होते.
‘प्रेमाचा खळबळजनक अंत’
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, गिरीश आणि प्रियंका यांचा चार वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना जुळ्या मुली होत्या. सुरुवातीला सर्व काही सुरळीत असताना, कालांतराने त्यांच्यात घरगुती वादाला सुरुवात झाली. हे वाद इतके विकोपाला गेले की, गिरिशने टोकाचे पाऊल उचलण्याचे ठरवले.
सहा महिन्यांपासून रचला होता बनाव
सुमारे सहा महिन्यांपूर्वी प्रियांका आणि एक मुलगी अचानक बेपत्ता झाल्या होत्या. जेव्हा नातेवाईकांनी गिरिशला याबद्दल विचारले, तेव्हा त्याने अत्यंत सावधपणे उत्तर दिले की, “ती रागावल्यामुळे घर सोडून गेली, लवकरच परत येईल.” प्रियांकाच्या आजोबांना म्हणजे रमणभाई यांना संशय येऊ नये म्हणून तो सतत खोटे बोलत राहिला. मात्र, सहा महिने उलटूनही काहीच संपर्क न झाल्याने अखेर आजोबांनी पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
घरात सापडले सांगाडे
पोलिसांनी याप्रकरणी सखोल चौकशी केल्यानंतर अटकेच्या भीतीने गिरिशने रुग्णालयात जाऊन आत्महत्या केली. त्याने चिठ्ठीत दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने त्याच्या घराचे खोदकाम केले. यावेळी जमिनीखाली दोन सांगाडे सापडले, जे प्रियांका आणि चिमुरड्या परीचे असल्याचे मानले जात आहे. पोलिसांनी हे सांगाडे ताब्यात घेतले असून ते फॉरेन्सिक लॅबमध्ये डीएनए चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
हत्येचे नेमके कारण काय?
या कृत्यात त्याला आणखी कोणाची मदत झाली होती का? या दिशेने आता वडनगर पोलीस अधिक तपास करत आहेत. एका संशयास्पद आत्महत्येने सहा महिन्यांपासून दडपलेलं एक भीषण सत्य समोर आणलं आहे.
