गुजरातमधील वडोदऱ्यात बसच्या ऑटोमॅटिक दरवाजात मान अडकल्याने सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी, २० ऑगस्ट रोजी, एका वाहन दुरुस्ती केंद्राजवळ घडली. मृत मुलाचे नाव दिव्येश राठवा असून तो इयत्ता दुसरीत शिकत होता. पोलिसांच्या माहितीनुसार, बस एका वर्कशॉपमध्ये उभी होती. बसचा चालक वाहनातून उतरून चहा पिण्यासाठी गेला होता. त्यानंतर मुलाची मान बसच्या पुढील दरवाजात अडकल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले. मात्र, दिव्येश त्या ठिकाणी कसा पोहोचला आणि त्याची मान दरवाजात कशी अडकली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबद्दल सविस्तर वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

शाळेतून आल्यानंतर पुन्हा घराबाहेर पडला

दिव्येशचे वडील राकेश राठवा यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दिव्येश दुपारी सुमारे साडेबारा वाजता शाळेतून घरी आला होता. त्यानंतर प्रसाद आणण्यासाठी जात असल्याचे सांगून तो पुन्हा घराबाहेर पडला. काही वेळाने कुटुंबीयांना मुलगा सूर्यनगर-तरसाली बायपासवरील एका ऑटोमोबाईल वर्कशॉपजवळ असल्याची माहिती मिळाली. कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले तेव्हा दिव्येश बसजवळ बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. राठवा कुटुंबीय मूळचे छोटा उदेपूर जिल्ह्यातील पावी जेतपूर तालुक्यातील असून, दिव्येशचे वडील वडोदऱ्यात खासगी बायोगॅस कंपनीत काम करतात.

सीसीटीव्हीमध्ये धक्कादायक दृश्य

घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील उपलब्ध फुटेजमध्ये दिव्येश बसच्या दरवाजात मान अडकलेल्या अवस्थेत दिसत आहे. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेले काही लोक दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करताना दिसतात. दरवाजा थोडा उघडल्यानंतर मुलाचे शरीर खाली पडताना फुटेजमध्ये दिसते. मात्र, घटनेच्या काही मिनिटांपूर्वीचे महत्त्वाचे फुटेज उपलब्ध नाही. सुमारे १५ मिनिटांचा सीसीटीव्ही रेकॉर्ड गायब असल्याने पोलिसांनी या बाबीचाही तपास सुरू केला आहे.

झोन-३ चे पोलीस उपायुक्त अभिषेक गुप्ता यांनी सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार त्या वेळेत परिसरात काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे फुटेज तांत्रिक कारणामुळे गायब झाली की ते जाणीवपूर्वक हटवण्यात आले, याची चौकशी केली जात आहे.

ऑटोमॅटिक दरवाजा मुलाच्या दबावाने उघडला?

फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी बोलावण्यात आले आहे. बसचा हायड्रॉलिक ऑटोमॅटिक दरवाजा बंद असताना एखाद्या मुलाच्या दबावामुळे उघडू शकतो का, याचीही तपासणी केली जाणार आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, उपलब्ध सीसीटीव्हीच्या आधीच्या भागात चालक बसचा दरवाजा बंद करून बाहेर जाताना दिसतो. त्यानंतरच्या फुटेजमध्ये मुलगा दरवाजात अडकलेल्या अवस्थेत दिसतो. यामधल्या वेळेचं सीसीटीव्ही फूटेज मात्र गायब आहे.

दरम्यान, परिसरातील मुले या ठिकाणी खेळण्यासाठी येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे दिव्येश वर्कशॉपपर्यंत कसा पोहोचला, तो बसजवळ काय करत होता आणि दुर्घटनेपूर्वी नेमके काय घडले, याचा तपास सुरू आहे. कपोराई पोलिसांनी प्रकरण नोंदवून तपास सुरू केला असून दिव्येशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.