scorecardresearch

“आपण माणसं आहोत आणि आपल्याला देवाची गरज आहे”, उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी मांडली भूमिका!

न्यायमूर्ती म्हणतात, “या दोन वर्षांनी आपले नातेसंबंध, काम आणि नीतीमूल्यांविषयी आपल्याला खूप काही शिकवलं आहे.”

justice pardiwala on corona gujrat high court
न्यायमूर्ती पारदीवाला यांनी करोना काळातील त्यांचे अनुभव सांगितले आहेत.

न्यायालये ही सामान्यपणे कायद्याच्या भाषेत आणि पुराव्यांवरच विश्वास ठेवणारी असतात, त्यानुसारच चालतात आणि त्यानुसारच चालायला हवीत अशी सर्वमान्य अपेक्षा असते. मात्र, अनेकदा न्यायामूर्ती या चौकटीच्या बाहेर जाऊन एक माणूस म्हणून देखील भूमिका मांडताना दिसतात. अशाच प्रकारची एक भूमिका गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जमशेद पारदीवाला यांनी मांडली आहे. सोमवारी संध्याकाळी अहमदाबाद पारसी पंचायतीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी करोना काळातील आपल्या अनुभवाविषयी मत व्यक्त केलं.

बदल हाच शाश्वत आहे…

“हेरिक्लायटस नावाच्या ग्रीक तत्ववेत्त्याने म्हटल्याप्रमाणे बदल ही एकमेव गोष्ट शाश्वत आहे. आपण सातत्याने पुढे जात राहायला हवं आणि त्यातून सुधारणा घडवून आणत राहायला हवं. कारण बदल ही एकमेव बाब कायमस्वरूपी राहणारी आहे. अवघ्या दोन वर्षात आपलं आयुष्य किती मोठ्या प्रमाणावर बदलून गेलं आहे”, असं न्यायमूर्ती पारदीवाला यांनी म्हटलं आहे.

“२०२० आणि २१ नं आपल्याला खूप काही शिकवलं”

गेल्या दोन वर्षांनी आपल्याला खूप काही शिकवल्याचं देखील न्यायमूर्ती पारदीवाला यांनी म्हटलं आहे. “आजपर्यंतच्या इतिहासात दोन भयानक वर्ष कुठली असतील, तर ती नक्कीच २०२० आणि २०२१ असतील. या काळात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे. या दोन वर्षांनी आपल्याला खूप काही शिकवलं आहे. आपले नातेसंबंध, काम आणि नीतीमूल्यांविषयी शिकवलं आहे. महत्त्वाचं म्हणजे या दोन वर्षांनी आपल्याला आठवण करून दिली आहे की आपण माणूस आहोत आणि आपल्याला देवाची गरज आहे”, असं न्यायमूर्ती पारदीवाला म्हणाले आहेत.

“माझ्यामते, या कठीण काळात देखील आपल्याला समर्थ ठेवणारी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे श्रद्धा आणि आशा. श्रद्धेमध्ये लोकांना त्यांच्या जीवनाचं कारण सापडलं आणि आशेमध्ये कोणत्याही संकटाचा सामना करण्याचं धैर्य लोकांना मिळालं”, असं देखील न्यायमूर्तींनी यावेळी बोलताना नमूद केलं.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gujrat high court justice jamshed pardiwala on corona lockdown pmw

ताज्या बातम्या