Gujrat Horror वडील आणि मुलीचं नातं हे आई आणि मुलीच्या नात्याप्रमाणेच अतिशय प्रेमाचं असतं. वडील कितीही कठोर असले तरीही मुलगी ही त्यांच्यासाठी हळवा कोपराच असते. मात्र गुजरातच्या राजकोटमध्ये जी घटना घडली आहे ती या वडील मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी आहे. एका मुलीने तिच्या वडिलांना ठार मारलं आहे. वडील मुलीकडे राहात होते. त्यानंतर मुलीने तिच्या पतीसह मिळून वडिलांना ठार केलं. शिवाय आपल्यावर काही आळ येऊ नये म्हणून वडिलांच्या मृतदेहाला अंघोळ घातली, कपडे बदलले आणि निर्जन ठिकाणी मृतदेह फेकला. त्यानंतर काही घडलंच नाही असा बनाव या दोघांनीही केला होता. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली.
नेमकी काय घटना घडली?
हे प्रकरण गुजरातच्या राजकोटमधील पडाधारी तालुक्यातलं आहे. या तालुक्यातील तरघाडी गावात वडील मुलगी आणि जावयासह राहात होते. पोलिसांना १ जुलैच्या दिवशी एक अनोळखी मृतदेह सुवाग या गावाजवळ आढळू न आला. यानंतर पोलिसांनी यासंबंधीची चौकशी सुरु केली. हा काहीतरी घातपाताचा प्रकार असावा असा संशय पोलिसांना मृतदेह पाहून वाटला होता. त्यामुळे मृतदेह फॉरेन्सिक विभागाकडे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. ज्यानुसार ही हत्या असल्याची बाब समोर आली. पोलिसांनी आधुनिक तंत्राचा वापर करत मृतदेह मिळाला होता त्या व्यक्तीचा मुलाला म्हणजेच कांती दामोरला शोधलं. कांती दामोरने मृतदेहाची ओळख पटवत हे माझे वडील हिंमतसिंह दामोर आहेत हे सांगितलं. तसंच ते पडाधारी या गावात मुलीसह आणि तिच्या पतीसह राहात होते अशीही माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी खेता अजनार (हिंमतसिंह यांची मुलगी) आणि तिचा पती गणपत अजनार या दोघांनाही ताब्यात घेतलं. सुरुवातीला दोघांनी टाळाटाळ केली. पण कसून चौकशी केल्यानंतर अखेर या दोघांनी गुन्हा कबूल केला. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
मुलीने आणि जावयाने कशी केली हत्या?
खेता आणि गणपत या दोघांनीही पोलिसांच्या चौकशीत सांगितलं की हिंमत सिंह वारंवार निष्काळजीपणा करत असत. ज्यानंतर वाद होत असत आणि वादाचं रुपांतर मोठ्या भांडणात होत असे. यामुळे कंटाळून ३० जूनला मुलीने आणि तिच्या नवऱ्याने वडिलांना काठीने मारहाण केली, त्यानंतर लोखंडी रॉडनेही फटके दिले. ही मारहाण इतकी बेदम होती की या घटनेत हिंमत सिंह यांचा मृत्यू झाला. त्यानंतर या दोघांनी आपल्यावर आळ येऊ नये म्हणून हिंमत सिंह यांचा मृतदेह धुतला. त्या मृतदेहाचे रक्ताने माखलेले कपडे धुतले. हिंमत सिंह यांच्या मृतदेहावर दुसरे कपडे चढवले. त्यानंतर हा मृतदेह निर्जन भागात फेकला. काही घडलंच नाही असा बनाव रचत ते घरी परतले. मात्र पोलिसांना हा मृतदेह मिळाला आणि त्यानंतर या खुनाचा वाचा फुटली. पोलिसांनी या प्रकरणात खेता आणि तिचा नवरा गणपत या दोघांनाही अटक केली.