करोनाच्या संकटासोबतच म्युकरमायकोसिस अर्थात काळ्या बुरशीचं संकटही देशावर घोंघावत आहे. याच आजाराशी यशस्वीरित्या झुंज देणाऱ्या दीपिकाबेन मुकेशभाई शाह यांची ही प्रेरणादायी कहाणी! बीबीसीने याबद्दलचं सविस्तर वृत्त दिलं आहे.
आत्तापर्यंत देशात म्युकरमायकोसिसचे १२ हजारांहून अधिक रुग्ण आढळून आलेले आहेत. या आजाराने जवळपास ५० टक्के रुग्णांचा मृत्यू होतो तर इतर रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी त्यांचा डोळा काढावा लागतो. डोळ्यांचे सर्जन डॉ. सपन शाह यांनी सांगितलं की दीपिकाबेन या काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव झालेल्या अगदी सुरुवातीच्या रुग्णांपैकी एक होत्या.

आणखी वाचा – अम्फोटेरिसिन- बी इंजेक्शनचा केंद्राकडून राज्यांना पुरवठा

ते म्हणाले, मी डिसेंबरमध्येही म्युकरमायकोसिसचे काही रुग्ण पाहिले होते, पण ते शस्त्रक्रियेसाठी तयार नव्हते. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये करोनाची लागण झालेल्या दीपिकाबेन यांच्यावर आत्तापर्यंत नाक, डोळा, तोंड आणि अजून एक अशा चार शस्त्रक्रिया झाल्या आहेत.
त्यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांचा एक डोळा काढावा लागला, सगळे दात काढावे लागले, नाकातली सगळी बुरशी साफ करावी लागली आणि शेवटच्या शस्त्रक्रियेदरम्यान डोक्यातलं एक हाडही काढावं लागलं कारण ही बुरशी तिथपर्यंत पोहोचली होती.
डॉ. शाह यांनी आत्तापर्यंत डोळा काढण्याच्या ६० हून अधिक शस्त्रक्रिया केल्या आहेत. १४ नोव्हेंबर रोजी जेव्हा दीपिकाबेन डॉ. शाह यांच्याकडे गेल्या तेव्हा त्यांनी सांगितलं की, त्यांना एका डोळ्याने स्पष्ट दिसत नाही. डॉक्टरांनी सांगितलं की, त्यावेळी दिपिका यांच्यावर करोनाचे उपचार सुरु होते आणि त्यांना स्टेरॉईड्स दिले जात होते.

आणखी वाचा – मुंबईत ‘म्युकरमायकोसिस’चे ४०० रुग्ण

डॉ. शाह यांनी सांगितलं की, जेव्हा त्या माझ्याकडे आल्या होत्या, तेव्हा त्यांची परिस्थिती फारच वाईट होती. मी त्यांना डोळा काढण्याचा सल्ला दिला. पण त्यावेळी हे योग्य समजलं जात नव्हतं. त्यांच्या परिवारातले लोकही जरा गोंधळात होते. मात्र, दोन तीन दिवसांनंतर त्यांनी डोळा काढण्याचा निर्णय घेतला.
४२ वर्षीय दीपिकाबेन यांचं वजनही करोनाच्या काळात ८२ किलोवरुन ५० किलोवर आलं होतं. त्यांना डायबेटिसही नव्हता पण करोनानंतर त्यांची शुगर ५५० पर्यंत वाढली होती. आठ-नऊ महिन्यानंतर दीपिका यांना पुन्हा काळ्या बुरशीचा त्रास सुरु झाला. त्यांना काळी आणि पांढरी बुरशी अशा दोन्हीचा संसर्ग झाला होता.
आत्तापर्यंत त्यांच्या उपचारासाठी ५० लाख रुपये खर्च झाले असून अजून नकली दात बसवणं, खोटा डोळा बसवणं यासाठी अजून काही खर्च होणार असल्याचं दीपिकाबेन यांनी सांगितलं. त्या म्हणतात की, त्यांना तीन महिन्यांपर्यंत दररोज सहा इन्जेक्शन दिले जात होते. एका दिवसाला ४८ हजारांची इन्जेक्शन्स द्यावी लागत होती.

आणखी वाचा – म्युकरमायकोसिसची स्थिती चिंताजनक; ५७ जणांचा मृत्यू

नाक आणि डोळ्यांमधली नस कापल्यानं त्यांना अजूनही खाताना, श्वास घेताना त्रास होतो. डॉक्टरांनी सांगितलं की अजून काही दिवस हा त्रास होणार आहे. जी नस कापली गेली, ती नैसर्गिकरित्या जोडली जावी यासाठी वेळ द्यावा लागणार आहे.