दोन वर्षांपूर्वी जी-२३ नावाचा गट स्थापन करून त्यामध्ये काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी पक्षनेतृत्व आणि पक्षातील कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली होती. तसेच, राहुल गांधींच्या नेतृत्वावर देखील आक्षेप घेतला होता. याच जी-२३चे एक सदस्य असलेले जम्मू-काश्मीरमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आपल्याच पक्षावर परखड शब्दांत निशाणा साधला आहे. तसेच, “नवा पक्ष स्थापन करण्याचा कोणताही विचार नाही, पण राजकारणात काय होईल, हे कुणीच सांगू शकत नाही”, असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे काँग्रेसला आगामी काळात पक्षाच्याच ज्येष्ठ नेत्यांकडून धक्के बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकीकडे पक्षाचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल नेतृत्वावर टीका करण्यात अजिबात मागेपुढे पाहात नसताना आता गुलाम नबी आझाद यांनी देखील विरोधाचा शंख फुंकला आहे. जम्मू-काश्मीरमधील गुलाम नबी आझाद यांचे निष्ठावान असलेले काँग्रेसचे २० पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षाचा राजीनामा देणार असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये नव्या पक्षाच्या स्थापनेची चर्चा जोरात सुरू झाली आहे.

“लाखो समर्थकांसाठी राजकारणात राहिलो”

“राजकारणात पुढे काय घडेल, हे कुणीही सांगू शकत नाही, जसं कुणीही हे सांगू शकत नाही की त्याचा मृत्यू कधी होणार आहे. राजकारणात कधीही काहीही घडू शकतं, पण नवा पक्ष स्थापन करण्याचा कोणताही विचार नाही. माझी स्वत:ची राजकारण सोडण्याची इच्छा होती. पण लाखो समर्थकांसाठी मी काम करत राहिलो”, असं आझाद म्हणाले. जम्मू-काश्मीरमध्ये एका सभेमध्ये ते बोलत होते.

“नेतृत्वाला कुणीही आव्हान देत नाहीये…”

दरम्यान, गुलाम नबी आझाद यांनी यावेळी बोलताना इंदिरा गांधी-राजीव गांधी आणि काँग्रेसचं आत्ताचं नेतृत्व यांच्यात तुलना केली आहे. “नेतृत्वाला कुणीही आव्हान देत नाहीये. इंदिरा गांधी आणि राजीव गांधींनी मला काही चुकीचं घडल्यास त्यावर प्रश्न विचारण्याची मोकळीक दिली होती. त्यांचा टीकेबाबत आक्षेप नसायचा. त्यांना यात अपमान नव्हता वाटत. आज काँग्रेसमध्ये नेतृत्वाला यात अपमान वाटतो”, असं गुलाम नबी आझाद पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

भाजपाविरोधी राष्ट्रीय आघाडीत काँग्रेस असेल का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…!

“नकार म्हणजे अपमान नव्हे”

गुलाम नबी आझाद यांनी राजीव गांधी राजकारणात आले, तेव्हाचा एक प्रसंग यावेळी सांगितला. “जेव्हा राजीव गांधींनी राजकारणात प्रवेश केला, तेव्हा इंदिरा गांधींनी आम्हाला दोघांना बोलावून घेतलं. त्यांनी राजीव गांधींना सांगितलं, की गुलाम नबी मला देखील नाही म्हणू शकतात. पण तो नाही म्हणजे अपमान नव्हे. तो नकार पक्षाच्या हितासाठी असतो. आज कुणीही तो नकार ऐकायला तयार नाही. आज तुम्ही नाही म्हणालात तर तुमची किंमत शून्य होते”, असं आझाद म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gulam nabi azad compares congress leader sonia gandhi rahul with indira gandhi pmw
First published on: 05-12-2021 at 13:07 IST