श्रीनगर: काश्मीरमधील जागतिक दर्जाचे प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गुलमर्गमध्ये सोमवारी एक मोठी दुर्घटना घडली. येथील मुख्य आकर्षण असलेल्या ‘गोंडोला’ केबल कार सेवेमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे शेकडो पर्यटक शेकडो फूट उंचावर हवेतच अडकून पडले. खराब हवामाना दरम्यान ही घटना घडल्यामुळे पर्यटकांमध्ये काही काळ प्रचंड भीतीचे वातावरण होते. मात्र, घटनेची माहिती मिळताच भारतीय लष्कर , जम्मू-काश्मीर पोलीस आणि SDRF च्या टीमने तातडीने युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले आहे.

६५ केबिन हवेतच अडकल्या; आतापर्य़ंत ११६ पर्यटकांना सुखरूप काढले बाहेर

मिळालेल्या माहितीनुसार, अचानक आलेल्या खराब हवामानामुळे केबल कारच्या सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड झाला. यामुळे तब्बल ६५ केबिन हवेतल्या हवेतच थांबल्या. भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत २१ केबिनमधून ११६ पर्यटकांना अत्यंत सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले आहे. इतर केबिनमधील पर्यटकांनाही सुखरूप बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

घाबरू नका, परिस्थिती नियंत्रणात: मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला

या संपूर्ण घटनेवर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला स्वतः लक्ष ठेवून आहेत. त्यांनी सोशल मीडियाद्वारे नागरिकांना आणि पर्यटकांच्या नातेवाईकांना धीर दिला आहे. “तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडला असून सर्व केबिन सुरक्षित आहेत. जमिनीवर आमची प्रशिक्षित पथके तैनात असून बचावकार्य वेगाने सुरू आहे. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून कोणीही घाबरून जाण्याचे कारण नाही,” असे आवाहन मुख्यमंत्री अब्दुल्ला यांनी केले आहे.

दुसरीकडे, जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल (LG) मनोज सिन्हा यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, पोलीस महासंचालक (DGP) नलीन प्रभात यांना स्वतः घटनास्थळी जाऊन बचावकार्याची देखरेख करण्याचे आदेश दिले आहेत.

काय आहे पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेली गुलमर्गची ‘गोंडोला’ सेवा?

गुलमर्गमधील ‘गोंडोला’ ही आशियातील सर्वात मोठी आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च केबल कार सेवा मानली जाते.

  • ही केबल कार पर्यटकांना जमिनीवरून थेट १४,००० फूट उंचीवर असलेल्या ‘अफरवत पीक’ (Apharwat Peak) पर्यंत घेऊन जाते.
  • ही सेवा दोन टप्प्यांत (Phases) चालवली जाते.
  • येथे पर्यटकांची इतकी गर्दी असते की, या केबल कारचे बुकिंग अनेक आठवडे आधीच फुल्ल असते.

सध्या लष्कर आणि स्थानिक प्रशासनाकडून अडकलेल्या प्रत्येक पर्यटकाला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी ‘रेस्क्यू ऑपरेशन’ वेगाने राबवले जात आहे.