सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओवरून कर्नाटकचे उपमुख्यमंत्री जी परमेश्वरा यांच्यावर मोठ्याप्रमाणात टीका होताना दिसत आहे. सुरक्षा रक्षकाकडून (गनमन) त्यांनी आपले कपडे साफ करून घेतले. उपमुख्यमंत्र्यांच्या कुर्ता, पायजमा आणि बुटाला चिखल लागला होता. त्यांनी सुरक्षा रक्षकाकडून त्यांचे कपडे साफ करून घेतले. नेमके त्याचवेळी प्रसारमाध्यमांनी त्याचे चित्रीकरण केले. सोशल मीडियावर तो व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

परमेश्वरा हे बेंगळुरूच्या दौऱ्यावर असताना अल्सूर येथील यल्लम्मा कोइल येथे गेले होते. त्यावेळी चालत असताना त्यांच्या कुर्ता, पायजमा आणि बुटांना चिखल लागला होता. कार्यकर्त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यावेळी स्थानिक नगरसेविका ममता सरवाना यांच्या पतीने कपडे साफ करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी परमेश्वरा यांनी त्यांना मनाई केली आणि सुरक्षा रक्षकाला कपडे व बूट साफ करण्यास सांगितले. त्यानंतर त्या सुरक्षा रक्षकाने पाण्याने त्यांचा पायजमा स्वच्छ केला. हा संपूर्ण प्रकार इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी चित्रित केला आणि वाहिन्यांवर प्रसारित केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परमेश्वरा यांना मोठ्या टीकेस सामोरे जावे लागले.