पाकिस्तानी स्टॉक एक्सचेंजवर दहशतवादी हल्ला, पाच जणांचा मृत्यू; सर्व हल्लेखोरांचा खात्मा

पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला

पाकिस्तानमधील कराची स्टॉक एक्सचेंजवर हल्ला करणारे सर्व दहशतवादी ठार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चार दहशतवाद्यांनी स्टॉक एक्सचेंजवर हल्ला केला होता. या हल्ल्यात एक पोलीस उप-निरीक्षक आणि चार सुरक्षारक्षक ठार झाल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. जिओ न्यूजने हे वृत्त दिलं आहे.

दहशतवाद्यांनी मुख्य गेटवर ग्रेनेड हल्ला केला आणि नंतर गोळीबार करत इमारतीत घुसले असं पोलिसांनी सांगितलं आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात इमारतीच्या बाहेर सुरक्षेसाठी तैनात पोलीस अधिकारी आणि सुरक्षारक्षक जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण त्यांचा मृत्यू झाला. सुरक्षेच्या कारणास्तव सध्या संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.

गोळीबार करत दहशतवादी स्टॉक एक्सेंजमध्ये घुसले असल्याची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणांना घटनास्थळी धाव घेतली होती. स्टॉक एक्सेंजमध्ये ग्रेनेडचाही वापर करण्यात आला. पोलिसांनी चार दहशतवादी ठार केले होते तर एक इमारतीत लपला होता. नंतर त्याचाही खात्मा कऱण्यात आला.

हल्ल्यानंतर इमारतीत अडकलेल्या लोकांना मागील बाजूला असणाऱ्या दरवाजाने बाहेर काढण्यात आलं. “पाकिस्तान स्टॉक एक्स्जेंमध्ये दुर्देवी घटना घडली आहे,” असं ट्विट स्टॉक एक्स्चेंजचे संचालक आबिद अली हबीब यांनी केलं होतं. पार्किंगमधून मार्ग काढत ते घुसले आणि दिसणाऱ्या प्रत्येकावर गोळीबार केला असं त्यांनी सांगितलं. पोलिसांनी सध्या परिस्थिती नियंत्रणात असून इमारतीत सध्या सर्च ऑपरेशन सुरु असल्याचं सांगितलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Gunmen attack pakistan stock exchange building in karachi sgy

ताज्या बातम्या