पंजाबमधील गुरदासपूर पोटनिवडणुकीत भाजपला हादरा बसला आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे सुनील जाखड यांनी भाजपच्या स्वर्णसिंह सलारिया यांचा पराभव केला आहे. सुमारे दीड लाख मतांनी भाजप उमेदवाराचा पराभव झाला असून या विजयामुळे सहा महिन्यांपूर्वीच पंजाबमध्ये सत्तेवर आलेल्या काँग्रेसच्या गोटात उत्साह संचारला आहे.

अभिनेता विनोद खन्ना हे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गुरदासपूरमधून खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र एप्रिलमध्ये विनोद खन्ना यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त होती. या जागेसाठी ११ ऑक्टोबर रोजी मतदान झाले. सुमारे ५६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या लोकसभा मतदारसंघात एकूण ९ विधानसभा संघांचा समावेश होतो. काँग्रेसतर्फे या निवडणुकीत सुनील जाखड यांना तिकीट देण्यात आले होते. जाखड हे पंजाब काँग्रेसचे प्रमुख असून मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात. तर भाजपने स्वर्णसिंह सलारिया आणि आम आदमी पक्षाने मेजर जनरल (निवृत्त) सुरेश खजूरिया यांना रिंगणात उतरवले होते. जाखड यांनी सुमारे दीड लाख मतांनी विजय मिळवत भाजपचा पराभव केला. या विजयानंतर पंजाबमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. जनतेने या निवडणुकीतून भाजपला इशारा दिला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी दिली.

केरळमध्ये वेंगारा विधानसभा मतदारसंघातही ११ ऑक्टोबर रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडले होते. रविवारी या मतदारसंघातही मतमोजणी पार पडली. यात ‘यूडीएफ’चे केएनए खाडेर विजयी झाली असून भाजपप्रणित एनडीएच्या उमेदवाराला चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले.