गुडगाव सेक्टर -४७ मधील मोकळ्या जागेत नमाज पठण करण्यास विरोध केल्याचे प्रकरण थांबण्याचे नाव घेत नाही आहे. सलग चौथ्या आठवड्यात, रहिवाशांच्या एका गटाने शुक्रवारी गुडगावच्या सेक्टर ४७ मध्ये उघड्यावर नमाज पठण करण्यास आक्षेप घेतला आहे. त्यामुळे रिकाम्या ठिकाणी नमाज पठण करण्याची बाब गंभीर होत चालली आहे. स्थानिक लोकांच्या विरोधाबरोबरच आता अनेक धार्मिक आणि सामाजिक संघटनांनीही याला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक लोकांनी उघड्यावर नमाज पठण करण्यास आक्षेप घेतल्यानंतर, गुडगाव पोलिसांच्या देखरेखीखाली, नमाजसाठी ठरवलेल्या ठिकाणापासून १०० मीटर अंतरावर नमाज पठण करण्यात येत आहे.

त्यानंतर आता पुन्हा शुक्रवारी पोलिसांच्या प्रचंड बंदोबस्तात नमाज पठण करण्यात आले. कारण किमान ७०-८० लोकांनी फलक घेऊन, घोषणा दिल्या आणि नमाज पठण करत असलेल्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी या लोकांना रोखले.

पोलिसांनी यापूर्वी मुस्लिम समाजातील सदस्यांना संघर्ष टाळण्यासाठी सुभाष चौक बाजूने प्रार्थनास्थळी पोहचण्यास सांगितले होते. एसीपी अमन यादव म्हणाले, “प्रार्थना शांततेत झाल्या. गेल्या आठवड्यात आम्ही दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींसोबत बैठका घेतल्या आहेत आणि आम्ही समस्या सोडवण्याच्या दिशेने काम करत आहोत.”

शुक्रवारी दुपारी १२.४० वाजता, स्थानिक रहिवासी नमाज पठण करण्याच्या ठिकाणी जमले आणि त्यांनी माइक आणि पोर्टेबल स्पीकर वापरून धार्मिक गाणी आणि भजने गायली. सार्वजनिक ठिकाणी नमाज बंद करण्यात अपयशी ठरल्याबद्दल त्यांनी सरकारविरोधात घोषणाही दिल्या.

सेक्टर ४७ मधील रहिवाशांचे असे म्हणणे आहे की, हे सर्व एका आंतरराष्ट्रीय षडयंत्राखाली केले जात आहे. जर त्यांनी आवाज उठवला नाही तर उद्या हे लोक येथे मशीद बांधतील. उघड्यावर नमाज पठाण करण्याबाबत ही बाब आजपासून नाही तर २०१८ पासून सुरू आहे. त्यावेळी प्रशासनाने दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींना एकत्र बसवून समस्या सोडवली होती आणि नमाजसाठी सेक्टर ४७ मधील साइट ३७ चिन्हांकित केली होती. मात्र, नमाजच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांचे असे म्हणणे  आहे की ही परवानगी कायमची नव्हती. उलट, ही परवानगी फक्त १ दिवसासाठी देण्यात आली होती.

तीन वर्षांपासून येथे येत असलेला तौफिक म्हणाला, “गेल्या काही आठवड्यांत ही समस्या उभी राहिली आहे. काही लोक जे यातून राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते गोंधळ निर्माण करत आहेत. ”

या महिन्याच्या सुरुवातीला पोलिस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात गुडगाव नागरिक एकता मंच (जीएनएम) या नागरिक मंचाने दावा केला आहे की गेल्या काही महिन्यांत तीन भागातील प्रार्थनास्थळे बंद करण्यात आली आहेत.