Pranit More Biryani Controversy Gurgaon firm fires Himanshu Jangra : बिर्याणीचं ३७० रुपयांचं बिल भरलंय, मग ते पैसे वसूल नको का करायला? महिलांप्रती असं वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी हिमांशु जांग्रा या २३ वर्षीय तरुणाला नोकरीवरून काढून टाकण्यात आलंय. कॉमेडियन प्रणीत मोरेच्या गुरुग्राम येथील क्राऊड वर्क कार्यक्रमात त्याने हे वक्तव्य केलं होतं. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने स्त्रीद्वेष आणि पुरुषप्रधान मानसिकतेबाबत मोठा वाद निर्माण झाला होता. यानंतर कंपनीने त्याची हकालपट्टी केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

हिमांशू जांग्रा याच्याशी संबंधित वाद काय आहे?

२३ वर्षीय जांग्राने गेल्या आठवड्यात बिग बॉस फेम प्रणीत मोरेच्या शोदरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणावर टीकेला सामोरं जावं लागलं. जांग्राने सांगितलं की, तो एका मुलीसोबत डेटवर गेला होता, तिथे त्याने ३७० रुपयांच्या चिकन बिर्याणीचं बिल भरलं. बिर्याणी खाल्ल्यानंतर त्या मुलीने घरी सोडण्याची विनंती केली. पण बिर्याणीसाठी ३७० रुपये खर्च झाले असल्याने ते वसूल करायला हवेत. म्हणून त्याने मुलीला घरी सोडण्यास नकार दिला आणि त्याच्यासोबत एका पार्कमध्ये येण्याची विनंती केली. पण ती तिथे यायला नकार देत होती. शेवटी ती त्याच्याबरोबर त्या पार्कमध्ये गेली, तिथे गेल्यावर जांग्राने रात्र होण्याची वाट पाहिली. ही सर्व कहाणी जांग्राने प्रणीत मोरेच्या कार्यक्रमात सांगितली. ही कहाणी सांगून झाल्यानंतर प्रणीत मोरेनेही त्याच्या या वक्तव्यावर खळखळून दाद दिली. हाच व्हिडिओ आता सोशल मीडियावर ट्रोल होत असून प्रणीत मोरेलाही टीकेचा सामना करावा लागत आहे.

स्टारविक डिझाईनने हिमांशू जांग्राला नोकरीवरून काढले

दरम्यान, हिमांशु जांग्रा हा स्टारविक डिझाईन या डिझाईन आणि ब्रँडिंग फर्ममध्ये वेब डेव्हलपर पदावर काम करत होता. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, या कंपनीचे संस्थापक विवेक विश्वकर्मा यांनी त्याला कामावरून काढून टाकलं. याकरता विवेक विश्वकर्मा यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्टही शेअर केली आहे. यामध्ये ते म्हणाले, “आमचा एक कर्मचारी हिमांशू जांग्रा याच्याबद्दल मला शेकडो मेसेज, ईमेल आणि फोन आले आहेत. तुमच्यापैकी अनेकांप्रमाणेच, माझ्या पाहण्यातही इंटरनेटवर फिरत असलेल्या त्या क्लिप्स आल्या. मी स्पष्ट करू इच्छितो की, त्या क्लिप्समधील विधाने अत्यंत आक्षेपार्ह आहेत. मी त्यांच्याशी अजिबात सहमत नाही. आमची कंपनी अशा विचारांचं समर्थन करत नाही आणि नक्कीच यामुळे तरुण मनावर चुकीचा प्रभाव पडता कामा नये. “

“कंपनीने अंतर्गत चौकशी केली, यावेळी महिला कर्मचाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. यावेळी जांग्राविरुद्ध कोणतीही तक्रार नसल्याचं समोर आलं. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याचं वर्णन कामाच्या ठिकाणी व्यावसायिक, आदरणीय, कष्टाळू आणि चांगली वर्तणूक असलेला व्यक्ती असं केलं. असं असूनही, ३७० रुपयांच्या बिर्याणीबाबत केलेल्या अत्यंत अयोग्य वक्तव्यामुळे त्याला वेब डेव्हलपरच्या पदावरून काढून टाकण्यात आलं”, असं विवेक विश्वकर्मा यांनी स्पष्ट केलं.

“कामाच्या ठिकाणाबाहेर घडलेल्या घटनेचा आता कामाच्या ठिकाणावर परिणाम झाला आहे. माझी कंपनी, आमची टीम, आमचे ग्राहक आणि आम्ही येथे निर्माण करत असलेल्या वातावरणाप्रती माझी एक जबाबदारी आहे. म्हणूनच आम्ही त्याच्याशी नाते तोडण्याचा (नोकरीवरून काढण्याचा) निर्णय घेतला आहे,” असं विश्वकर्मा म्हणाले. या घटनेमुळे २३ वर्षीय तरुणाला दीर्घकालीन परिणामांना सामोरे जावे लागू शकतं, असं सांगत त्यांनी सोशल मीडियावरील अतिउत्साही ट्रोलिंगबद्दल सावधगिरीचा इशारा देत आपल्या व्हिडिओचा शेवट केला. “सोशल मीडियावरील ट्रोलिंग ही थट्टा नाही आणि तीही एका २२-२३ वर्षांच्या तरुणासाठी. त्याचे भविष्य या एका चुकीच्या क्षणाचे परिणाम दीर्घकाळापर्यंत भोगणार आहे”,असं स्टारविक डिझाईनच्या संस्थापकांनी नमूद केले.