Gurgaon IT Couple Found Dead Husband : आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या एका तरुणाने पत्नीची हत्या करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुग्राममधून समोर आली आहे. आम्ही हे जग सोडून जातोय, असा इमेल त्याने त्याच्या कंपनीतीली सहकारी कर्मचाऱ्यांना पाठवला आणि मग आत्महत्या केली. बुधवारी त्याच्या पत्नीचा वाढदिवस होता, त्याचदिवशी मरिना रेसिडेन्शिअल सोसायटीत त्यांच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये दोघांचा मृतदेह सापडल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

मोहम्मद अस्लम (वय ३०) असं या व्यक्तीचे नाव असून, त्याने ईमेलमध्ये आपल्या पालकांचे आणि घरमालकाचे फोन नंबरही दिले होते आणि सहकाऱ्यांना त्यांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यास सांगितलं होतं. हा ईमेल मिळताच त्याच्या सहकाऱ्यांनी घरमालकाशी संपर्क साधला. घरमालकाने तात्काळ ‘एम ३ एम मरिना’ सोसायटीच्या टॉवर ७ मधील त्यांच्या फ्लॅटवर धाव घेतली. घरमालक तिथे पोहोचले तेव्हा अस्लम फ्लॅटमध्ये मृत अवस्थेत आढळला, तर त्याची पत्नी फरहाना (वय २८) जमिनीवर पडलेली होती आणि तिच्या गळ्यावर जखमेच्या खुणा होत्या. त्यानंतर घरमालकाने बादशाहपूर पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

पोलिसांना फ्लॅटमध्ये एक चिठ्ठी सापडली, ज्यावर “आम्ही हे जग सोडून जात आहोत” असं लिहिलं होतं. तसंच फरहानाच्या कपड्यांवर “आय लव्ह यू” असे शब्द हाताने लिहिलेले आढळले. नेमके काय घडले हे शोधण्यासाठी तपास अधिकारी ही चिठ्ठी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि घटनास्थळावरून मिळालेल्या इतर साहित्याची तपासणी करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अस्लमने आत्महत्या करण्यापूर्वी पत्नीची हत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण आणि घटनाक्रम शवविच्छेदन (Autopsy) अहवालानंतरच स्पष्ट होईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

संसारात कोणताही वाद नव्हता: कुटुंबीय

केरळमध्ये राहणाऱ्या या दांपत्याच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, त्यांच्यात कोणताही कौटुंबिक किंवा वैवाहिक वाद नव्हता. नातेवाईकांच्या मते, ते दोघे एकमेकांच्या खूप जवळ होते आणि एकत्र आनंदी दिसत होते. फरहानाचा भाऊ फैसल याने सांगितलं की, या घटनेने दोन्ही कुटुंबांना मोठा धक्का बसला आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना तो म्हणाला, “त्या दोघांमध्ये खूप जिव्हाळ्याचे संबंध होते. ते एकमेकांसोबत आनंदी होते आणि त्यांच्यात कोणताही वाद नव्हता.”

कुटुंबीयांनी माहिती दिली की, अस्लमवर गेल्या १८ महिन्यांपासून नैराश्याचे उपचार आणि थेरपी सुरू होती. मात्र, आपण इतक्या मोठ्या मानसिक किंवा इतर त्रासातून जात आहोत, असं अस्लम किंवा फरहानाने कधीही बोलून दाखवलं नव्हतं. नातेवाईकांना संशय आहे की, कामाच्या प्रचंड ताणामुळे हे घडले असावं, तरीही याला अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. फैसलने सांगितलं, “आयटी क्षेत्रातील कामाच्या ताणामुळे ही घटना घडली असावी, असा आमचा संशय आहे.”

तीन महिन्यांपूर्वीच बेंगळुरूहून आले होते

अस्लम आणि फरहाना सुमारे तीन महिन्यांपूर्वीच बेंगळुरूहून गुरुग्रामला स्थलांतरित झाले होते. कोझिकोडचा रहिवासी असलेला अस्लम सेक्टर ५८ मध्ये ऑफिस असलेल्या एका इंडोनेशियन आयटी कंपनीत रुजू झाला होता. तर मल्लपुरमची असलेली फरहाना बेंगळुरूच्या एका आयटी कंपनीसाठी घरून काम करत होती. त्यांचं लग्न २०२३ मध्ये झालं होतं आणि गुरुग्रामला येण्यापूर्वी त्यांनी सुमारे दोन वर्षे बेंगळुरूमध्ये एकत्र घालवली होती. अस्लमने २०१८ मध्ये एनआयटी कालिकतधून इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती आणि २०२० मध्ये आयआईएम इंदूरमधून एमबीए पूर्ण केलं होतं. फरहानाने केरळमधील कुट्टिपुरम येथील एमईएस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून बी.टेक पूर्ण केलं होतं.

लॅपटॉप, फोन आणि इतर वस्तू जप्त

घरमालकाने पोलिसांना माहिती दिल्यानंतर सकाळी ८ वाजताच्या सुमारास आपत्कालीन प्रतिसाद वाहन घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांचं मोठं पथक तेथं आलं. फ्लॅटचा दरवाजा आतून बंद नव्हता. तपासादरम्यान पोलिसांनी फ्लॅटमधून तीन लॅपटॉप, दोन मोबाईल फोन, एक दोरी, डायरी, कात्री, पेन ड्राईव्ह, चिठ्ठी आणि एक पेन जप्त केला आहे. ही सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत. पोलिसांनी सांगितलं की, चिठ्ठीत कोणावरही कोणतेही आरोप करण्यात आलेले नाहीत. शुक्रवारी कुटुंबीयांनी शवगृहात जाऊन मृतदेहांची ओळख पटवली. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं खरं कारण स्पष्ट होईल, असं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.