Gurgaon Leopard Trail area crime news: हरियाणामधील गुरुग्राममध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील अरवली परिसरातील प्रसिद्ध असणाऱ्या ‘लेपर्ड ट्रेल’ या पिकनिक स्पॉटवर फिरण्यासाठी आलेल्या २३ वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. घटनेनंतर काही तासांत कारवाई केली असून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
ज्या तरुणीचे अपहरण करून अत्याचाराचा प्रयत्न झाला ती सिरसा जिल्ह्यातील रहिवासी आहे. ती गुरुग्राममधील एका रिअल इस्टेट कंपनीत काम करते. तसेच ती त्याच परिसरात पेईंग गेस्ट म्हणून राहते. शनिवारी रात्री उशिरा एका कार्यक्रमातून घरी जात असताना पीडिता आणि तिचा मित्र ‘लेपर्ड ट्रेल’वर फिरायला थांबले. ते तिथे त्यांच्या कारमध्ये असताना आरोपी गौरव भाटी (वय- २५) तिथे आला आणि त्यांना त्रास देऊ लागला.
वाद, अपहरण आणि पाठलागाचा थरार
ज्यावेळी आरोपीला दोघांनी त्रास का देत आहे, असं विचारले असता त्यांच्यात वाद झाला. आरोपी भाटीने पीडिता मुलीचा मोबाईल हिसकावला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुलीने आरोपीचा पाठलाग करून त्याला थांबवून मोबाईल मागितला असता आरोपीने तिला जबरदस्तीने त्याच्या महिंद्रा स्कॉर्पिओ एसयूव्ही गाडीमध्ये ढकलले आणि जंगलाकडे पळून गेला. त्यानंतर त्या मुलीच्या मित्राने आरोपीच्या गाडीचा काही अंतरापर्यंत पाठलाग केला पण तो तिथून पसार झाला होता. पीडितेच्या मित्राने पोलिसांना संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली.
गाडीचे चाक अडकले म्हणून वाचला तिचा जीव
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी महिलेच्या फोन लोकेशनचा वापर करून महिंद्रा स्कॉर्पिओ एसयूव्ही गाडीचा शोध घेतला. आरोपी भाटीने सदर्न पेरिफेरल रोड, सुभाष चौक आणि सेक्टर ७४ यासह वेगवेगळ्या दिशेने गाडी चालवली. त्यानंतर तो महिलेला एका निर्जन डोंगराळ, जंगली भागात घेऊन गेला. तिथे गाडीचे एक चाक चिखलात अडकले. महिलेने मदतीसाठी ओरडताच तो गाडीतून उतरला आणि पळून गेला. पोलिसांनी घटनास्थळी पोहचले आणि महिलेला वाचवले.
दारू खरेदीसाठी घेतली होती गाडी
पीडितेला वाचवल्यानंतर पोलिसांनी स्कॉर्पिओ गाडीवरून आरोपीचा शोध घेतला. नोंदणी तपशीलांमुळे गाडीच्या मूळ मालकापर्यंत पोलिसांना पोहचता आले. त्यानंतर समजले की भाटी दारू खरेदी करण्यासाठी त्याची गाडी घेऊन गेला होता. दरम्यान, आरोपीच्या मागावर पोलिसांनी तीन पथकांना तैनात केले होते. काही तासांतच पोलिसांनी आरोपी गौरव भाटीला ताब्यात घेतले. त्यानंतर फॉरेंसिक टीमने त्या भागात जाऊन पुरावे गोळा केले. वैद्यकीय तपासणीत आरोपीन मद्यधुंद होता हे निष्पन्न झाले.
पळून जाण्याचा प्रयत्न
जेंव्हा आरोपी भाटीला गुन्ह्याचे दृश्य पुन्हा तयार करण्यासाठी डोंगरावर नेण्यात आले तेंव्हा तिथून त्याने पळून जाण्याचाही प्रयत्न केला. पळून जाताना पाय घसरल्याने आरोपीचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला तसेच त्याच्या चेहऱ्यावरही मोठी दुखापत झाली. त्याला ताब्यात असलेल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर, भाटीला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले आणि न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
