डेरा सच्चा सौदाचा प्रमुख आणि बलात्कार प्रकरणातील दोषी गुरमीत राम रहिम सिंग पुन्हा एकदा तुरुंगाबाहेर आला आहे. हरियाणा सरकारने मंगळवारी राम रहिमला ३० दिवसांचा पॅरोल मंजूर केला. त्यानुसार आज सकाळीच त्याची रोहतकच्या सुनारिया तुरुंगातून सुटका करण्यात आली असून, २४ जून रोजी त्याला पुन्हा तुरुंगात परतावे लागणार आहे. राम रहिमला पॅरोल मिळण्याची ही १६ वी वेळ आहे.
विशेष म्हणजे, चालू वर्षात (२०२६) हरियाणा सरकारने राम रहिमला दुसऱ्यांदा पॅरोल मंजूर केला आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात त्याला ४० दिवसांचा पॅरोल देण्यात आला होता. आता पुन्हा ३० दिवसांची सुटका मिळाल्यामुळे, चालू वर्षातील त्याचा संपूर्ण पॅरोल कालावधी संपला आहे. आता त्याच्याकडे नियमानुसार केवळ २१ दिवसांची ‘फरलो’ (सुटी) शिल्लक आहे.
काय सांगतो तुरुंगाचा नियम?
तुरुंग प्रशासनाच्या नियमावलीनुसार (Jail Manual), कोणत्याही कैद्याला एका कॅलेंडर वर्षात ७० दिवसांचा पॅरोल आणि २१ दिवसांची फरलो मिळण्याचा कायदेशीर अधिकार असतो. मात्र, हा अधिकार पूर्णपणे राज्य सरकारच्या मंजुरीवर आणि विविध घटकांच्या तपासणीवर अवलंबून असतो. दरम्यान, “डेरा प्रमुखाची ही सुटका कोणत्याही विशेष सवलतीनुसार झालेली नसून, त्यांच्या कायदेशीर अधिकारानुसारच त्यांना हा पॅरोल मिळाला आहे,” अशी माहिती डेरा सच्चा सौदाचे प्रवक्ते आणि वकील जितेंद्र खुराना यांनी दिली आहे.
थेट सिरसा डेऱ्याकडे रवाना
मंगळवारी सकाळी रोहतकच्या सुनारिया तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर राम रहिम थेट सिरसा येथील आपल्या डेऱ्याकडे रवाना झाला. सिरसाच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडून (District Magistrate) आवश्यक ती परवानगी मिळाल्यानंतरच त्याला तिथे राहण्यास संमती देण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. या काळात त्याच्या हालचालींवर आणि सुरक्षेवर प्रशासकीय यंत्रणेचे बारीक लक्ष असणार आहे.
२०१७ पासून भोगतोय तुरुंगवास
गुरमीत राम रहिम सिंग ऑगस्ट २०१७ पासून रोहतकच्या सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगत आहे. २५ ऑगस्ट २०१७ रोजी पंचकुला येथील विशेष सीबीआय न्यायालयाने दोन साध्वींवर (महिला अनुयायी) बलात्कार केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवले होते आणि २० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती.
हिंसाचाराचा काळा इतिहास
२०१७ मध्ये राम रहिमला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर हरियाणा आणि पंजाबमध्ये, विशेषतः पंचकुलामध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उसळला होता. या दंगलीत तब्बल ४० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता, तर कोट्यवधी रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले होते.
हत्या प्रकरणांतून उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
बलात्काराच्या गुन्ह्याव्यतिरिक्त, डेराचा माजी व्यवस्थापक रणजीत सिंग आणि पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्या प्रकरणांमध्येही राम रहिमवर आरोप होते. खालच्या न्यायालयाने त्याला या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवले होते, मात्र पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने पुराव्यांभावी त्याची या दोन्ही हत्या प्रकरणांतून निर्दोष मुक्तता (Acquitted) केली आहे. सध्या तो केवळ बलात्कार प्रकरणातील २० वर्षांची शिक्षा भोगत आहे.
