गुरुग्राममधील गोल्फ कोर्स मार्गावर हिट अँड रनचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिला दुचाकीस्वाराचा पाठलाग करून तिच्या दुचाकीला जोरदार धडक देऊन पळ काढल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेत महिला जखमी झाली असून ती थोडक्यात बचावल्याचं दिसून आलं आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून आता सिया चौहानने प्रतिक्रिया दिली आहे.

सियाने नेमकं काय म्हटलं आहे?

सिया म्हणाली की माझा व्हिडीओ तर तुम्ही सगळ्यांनी पाहिलाच आहे. एक कार माझा पाठलाग करत होती. मी रविवारी बाईक राईड करते. मी तेव्हा हे पाहिलं नव्हतं की तो माझा पाठलाग केला. सुरुवातीला तो अत्यंत वेगात माझ्या बाजूने गेला. मला तेव्हा लक्षात आलं नाही मी दुर्लक्ष केलं. मग तो माझ्या बाजूला आला. त्यानंतर तो कारचालक आणि इतर लोक मला थांबण्यासाठी सांगत होता. कारमधल्या लोकांना मी पाहिलं ते मद्यधुंद अवस्थेत मला इशारे करत होते. मागे किती लोक बसले होते ते मला कळलं नाही. इशारे करत ते लोक माझ्या अगदी बाजूला खेटले होते. त्यानंतर मला धडक देण्यात आली आणि मी खाली पडले आणि माझा अपघात झाला असं सिया चौहान या तरूणीने माध्यमांना सांगितलं आहे.

नेमकी घटना काय घडली?

सिया नामक महिला इतर दुचाकीस्वारांबरोबर रविवारी बाईकिंगचा आनंद घेण्यासाठी निघाली होती. तिच्याकडे आरएस ४५७ ही दुचाकी होती. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये हरियाणाचा नोंदणी क्रमांक असलेली कार या महिलेचा दुचाकीचा पाठलाग करताना दिसते. त्यानंतर अचानक कार वेग घेत सियाच्या दुचाकीला धडक देताना दिसते. ही धडक जाणूनबुजून दिल्याचे व्हिडीओतून दिसत आहे. सियाने दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार रस्त्यावरून जात असताना ही कार त्यांचा पाठलाग करत होती. त्यामुळे तिने कार चालकाला सुरक्षित अंतर राखण्यास सांगितले. यावर कारमधील चालक संतापला आणि तिला दुचाकी बाजूला थांबवण्यास सांगू लागला. कारमध्ये चालकासह इतरही लोक होते. ते मद्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसत होते, असा आरोप सियाने केला आहे.

सियाचे वडील रोशन चौहान काय म्हणाले?

सोमवारी सिया या बाईकर तरूणीच्या वडिलांनी गुरुग्रामच्या सेक्टर ५६ मधल्या पोलीस ठाण्यात पोहचत तक्रार दाखल केली. पोलिसांकडे त्यांनी ही मागणी केली आहे की या घटनेसाठी नुसतं अपघातचं कलम न लावता हिट अँड रन आणि हत्येचा प्रयत्न या गुन्ह्यांसाठी असलेली कलमं लावली जावीत. त्यानंतर रोशन चौहान यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाला हे काही फक्त अपघाताचं प्रकरण नाही. माझ्या मुलीला ठार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. देवाचे मी आभार मानू इच्छितो की माझ्या मुलीला म्हणजेच सियाला या घटनेत काहीही गंभीर दुखापत झाली नाही. पण व्हिडीओ पाहिला तर कळेल की ती फरपटत बराच अंतर गेली होती. असं सियाचे वडील रोशन चौहान यांनी म्हटलं आहे.