Gurugram bike crash accused statement : गुरूग्राममध्ये एका महिला दुचाकीस्वाराला कारने धडक देऊन तिला काही मीटरपर्यंत फरफटत नेल्याचं समोर आलं आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तिच्या दुचाकीवर लावलेल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे. सिया नावाच्या या महिलेने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर गुरूग्राम पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर (FIR) नोंदवला आहे. आता, या घटनेतील संशयित आरोपीने महिला दुचाकीस्वाराच्या मोटारसायकलला जाणूनबुजून धडक दिल्याचा इन्कार केला आहे.

पीटीआय (PTI) या वृत्तसंस्थेनुसार संशयित आरोपीने म्हटलं की, “सुमारे २० ते २२ दुचाकीस्वार माझ्या शेजारून वेगाने गेले. एक तरुणी त्यापैकी एक दुचाकी चालवत आहे याची मला जाणीव नव्हती; मी फक्त तिला आणि तिच्यासोबत असलेल्या तरुणाला वेग कमी करण्यास सांगितलं होतं. मी त्यांना मुद्दाम धडक दिली नाही.” त्याने पुढे असा दावा केला की तो त्याच्या कुटुंबासह प्रवास करत होता आणि त्याने तरुणीला कोणतेही आक्षेपार्ह हातवारे केले नाहीत. तो म्हणाला, “मी तिला फक्त तिची दुचाकी हळू चालवण्यास सांगितलं होतं”, आणि पुढे जोडले की घटनेनंतर मारहाण होण्याच्या भीतीने तो तिथे थांबला नाही. “माझा अपघात झाला हे मी मान्य करतो. पण जर मी तिथेच थांबलो असतो, तर त्या लोकांनी आम्हाला मारहाण केली असती”, असा आरोप त्याने केला.

व्हिडिओमध्ये महिला दुचाकीस्वाराने काय म्हटले?

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या घटनेच्या व्हिडिओमध्ये सियाने व्हॉईसओव्हरद्वारे तिची आपत्ती मांडली आहे. तिने सांगितलं की, ही घटना रविवारी सकाळी घडली जेव्हा ती इतर दुचाकीस्वारांच्या समूहासोबत तिची ‘अप्रिलिया आरएस ४५७’ (Aprilia RS 457) ही स्पोर्ट्स बाईक चालवत होती. सियाने सांगितलं की, एका कारने त्यांच्या ग्रुपचा पाठलाग करण्यास सुरुवात केली आणि नंतर ती कार तिच्या जवळ आली, ज्यानंतर कारमधील लोकांनी तिच्याशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. सिया म्हणाली, “त्याने गोल्फ कोर्स रोडवर आमचा पाठलाग सुरू केला होता. मी त्याला अंतर राखून गाडी चालवण्यास सांगितलं. तो मला बाईक थांबवण्यास सांगत सतत हातवारे करत होता.”

कारने तिच्या मोटारसायकलचा रस्ता अडवू नये म्हणून ती सतत पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती, असंही तिने सांगितलं. तिने सांगितलं की तिच्या मागे असलेल्या एका मित्रानेही तिचे रक्षण करण्याचा आणि कारला तिच्या शेजारी येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या चारचाकी वाहनाने अचानक वळण घेतलं आणि सियाच्या मोटारसायकलला बाजूने जोरात धडक दिली, ज्यामुळे ती खाली पडली आणि तिची दुचाकी अनेक मीटरपर्यंत घसरत गेली.

“मला एफआयआरबद्दल (FIR) विचारणारे मेसेज येत आहेत. मी आज संध्याकाळपर्यंत माझ्या वकिलासोबत एफआयआर दाखल करेन आणि कायदेशीर कारवाई करेन”, असं ती म्हणाली. तिने पुढे सांगितलं की, तिला सध्या तिची ओळख किंवा चेहरा उघड करायचा नाही आणि ती कोणतीही मुलाखत देणार नाही. सिया म्हणाली, “मला आशा आहे की प्रत्येकजण माझ्या निर्णयाचा आदर करेल… माझ्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल धन्यवाद.”

दरम्यान, गुरूग्राम पोलिसांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, आरोपीची ओळख पटवून त्याला लवकरात लवकर अटक केली जाईल आणि “कडक कायदेशीर कारवाई” केली जाईल असे आश्वासन दिले आहे.