गुरुग्राममधील गोल्फ कोर्स मार्गावर हिट अँड रनचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिला दुचाकीस्वाराचा पाठलाग करून तिच्या दुचाकीला जोरदार धडक देऊन पळ काढल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेत महिला जखमी झाली असून ती थोडक्यात बचावल्याचं दिसून आलं आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून आता या प्रकरणी महिलेच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या मुलीला ठार मारण्याचा हा प्रयत्न आहे अपघात वगैरे नाही असं या मुलीच्या वडिलांनी म्हटलं आहे. तसंच या प्रकरणी तिच्या भावानेही प्रतिक्रिया दिली आहे.
तरूणीचे वडील रोशन चौहान काय म्हणाले?
सोमवारी या बाईकर तरूणीच्या वडिलांनी गुरुग्रामच्या सेक्टर ५६ मधल्या पोलीस ठाण्यात पोहचत तक्रार दाखल केली. पोलिसांकडे त्यांनी ही मागणी केली आहे की या घटनेसाठी नुसतं अपघातचं कलम न लावता हिट अँड रन आणि हत्येचा प्रयत्न या गुन्ह्यांसाठी असलेली कलमं लावली जावीत. त्यानंतर रोशन चौहान यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाला हे काही फक्त अपघाताचं प्रकरण नाही. माझ्या मुलीला ठार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. देवाचे मी आभार मानू इच्छितो की माझ्या मुलीला म्हणजेच सियाला या घटनेत काहीही गंभीर दुखापत झाली नाही. पण व्हिडीओ पाहिला तर कळेल की ती फरपटत बराच अंतर गेली होती. असं सियाचे वडील रोशन चौहान यांनी म्हटलं आहे.
सिया आधी खूप घाबरली होती-रौशन चौहान
रोशन चौहान म्हणाले या घटनेमुळे माझी मुलगी सिया खूप घाबरली. तिने सुरुवातीला आम्हाला याबाबत काहीही सांगितलं नाही. तिने आधी सांगितलं असतं तर आम्ही लगेचच पोलिसांत आलो असतो. माझ्या मुलीने काहीही चूक केलेली नाही. ती सगळे नियम पाळूनच बाईक चालवत होती. तिने हेल्मेटही घातलं होतं. तरीही तिला धडक देऊन तो कार चालक पळून गेला. त्यामुळे हे प्रकरण हिट अँड रनचं आहे आणि त्याने माझ्या मुलीला ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे असं रोशन चौहान म्हणाले आहेत. आम्हाला या प्रकरणी न्याय हवा आहे आणि न्याय मिळवण्यासाठी आम्ही जे करायचं असेल ते योग्य आणि सत्य मार्गाने करू. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
नेमके प्रकरण काय?
सिया नामक महिला इतर दुचाकीस्वारांबरोबर रविवारी बाईकिंगचा आनंद घेण्यासाठी निघाली होती. तिच्याकडे आरएस ४५७ ही दुचाकी होती. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये हरियाणाचा नोंदणी क्रमांक असलेली कार या महिलेचा दुचाकीचा पाठलाग करताना दिसते. त्यानंतर अचानक कार वेग घेत सियाच्या दुचाकीला धडक देताना दिसते. ही धडक जाणूनबुजून दिल्याचे व्हिडीओतून दिसत आहे. सियाने दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार रस्त्यावरून जात असताना ही कार त्यांचा पाठलाग करत होती. त्यामुळे तिने कार चालकाला सुरक्षित अंतर राखण्यास सांगितले. यावर कारमधील चालक संतापला आणि तिला दुचाकी बाजूला थांबवण्यास सांगू लागला. कारमध्ये चालकासह इतरही लोक होते. ते मद्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसत होते, असा आरोप सियाने केला आहे.
