गुरुग्राममध्ये अनधिकृत वैद्यकीय व्यवसायाविरुद्ध चालू असलेल्या कारवाईदरम्यान फक्त बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या एका तरुणाला सोमवारी अटक करण्यात आली. हा तरुण घाटा गावातील बंजारा मार्केटमध्ये डॉक्टर असल्याचे भासवून गर्भपाताचे बेकायदेशीर क्लिनिक चालवत होता असे पोलिसांनी सांगितले. आरोग्य विभागाने सापळा रचून ही कारवाई केली. संबंधित तरुणाकडे कोणतीही वैद्यकीय पदवी किंवा नोंदणी नसतानाही तो गर्भपाताच्या औषधांची विक्री करत असल्याचे तपासात उघड झाले.
सापळा रचून केली कारवाई
आरोपी कमल महतो याला रविवारी घाटा गावातील बंजारा मार्केट परिसरातील कमल क्लिनिकमधून ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी केल्यानंतर सोमवारी त्याला अटक करण्यात आली. गुरुग्रामच्या सिव्हिल सर्जन कार्यालयाला या क्लिनिकमध्ये बेकायदा गर्भपात केले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर तपासासाठी तयार करण्यात आलेल्या पथकामध्ये डेप्युटी सिव्हिल सर्जन डॉ. देवेंद्र सिंग सोलंकी आणि एमटीपी नोडल ऑफिसर डॉ. हरीश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली.
आरोग्य विभागाने सुमारे दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे भासवणाऱ्या एका महिलेला रुग्ण म्हणून क्लिनिकमध्ये पाठवले. आरोपीला १२०० रुपयांच्या खूण केलेल्या नोटा देण्यात आल्या होत्या. आरोपीने पैसे स्वीकारून तिला गर्भपातासाठी ‘अनवॉन्टेड किट’ एमटीपी औषध दिले आणि औषधांचा वापर कसा करायचा? याची माहितीही दिली, असे डॉ. सोळंकी यांनी सांगितले.
क्लिनिकवर छापा, मोठा साठा जप्त
संबंधित महिला रुग्णाने इशारा दिल्यानंतर आरोग्य विभागाच्या पथकाने क्लिनिकवर छापा टाकला. आरोपीच्या टेबलातून खूण केलेल्या नोटा आणि आणखी एक एमटीपी किट जप्त करण्यात आले. तसेच क्लिनिकमधून मोठ्या प्रमाणात अॅलोपॅथिक औषधे, अँटिबायोटिक्स, इंजेक्शन्स, कफ सिरप, आयव्ही फ्लुइड्स तसेच रक्तदाब मोजण्याचे यंत्र, स्टेथोस्कोप आणि ग्लुकोमीटरसारखी वैद्यकीय उपकरणे जप्त करण्यात आली. या औषधांच्या खरेदी-विक्रीची कोणतीही नोंद आढळली नाही.
चौकशीत कमल महतोने आपण केवळ बारावीपर्यंत शिक्षण घेतल्याची कबुली दिली. त्याच्याकडे वैद्यकीय पदवी, डॉक्टर म्हणून नोंदणी किंवा गर्भपात करण्यासाठी आवश्यक कायदेशीर परवानगी नसल्याचेही उघड झाले.
विविध कायद्यांनुसार गुन्हा
महतोविरुद्ध वैद्यकीय गर्भपात कायदा, राष्ट्रीय वैद्यकीय आयोग कायदा, औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५ जीव धोक्यात घालणे आणि कलम ३१८(४) फसवणूक अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
बेकायदा वैद्यकीय व्यवसायाविरोधात मोहीम सुरू
जून महिन्यात, एका आंतरराज्य मोहिमेदरम्यान, गुरुग्रामच्या आरोग्य विभागाने उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील आरोग्य अधिकाऱ्यांच्या सहकार्याने लिंगनिदान आणि बेकायदेशीर गर्भपाताचे एक आंतरराज्यीय जाळे उद्ध्वस्त केले. तसेच मे महिन्यात गुरुग्राममधील एका रुग्णालयावर छापा टाकून बेकायदा लिंगनिदान प्रकरणात एका रेडिओलॉजिस्टला अटक करण्यात आली होती.
मे महिन्यात डॉ. सोलंकी यांच्या पथकाने गुरुग्राममधील खांडसा रोडवरील आयु हॉस्पिटलवर छापा टाकला होता. या कारवाईत, रुग्णालयात बेकायदेशीरपणे लिंगनिदान चाचण्या केल्याच्या आरोपावरून सल्लागार रेडिओलॉजिस्ट डॉ. मनजीत कुमार यांना अटक करण्यात आली. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा स्पष्ट केले की, संपूर्ण जिल्ह्यात कडक देखरेख आणि अचानक छापे टाकण्याची मोहीम यापुढेही चालूच राहील.
