Man kills wife body parts fridge: श्रद्धा वालकरची ज्या प्रकारे हत्या करण्यात आली होती. तसा प्रकार आसामच्या गुवाहाटीमध्ये घडल्याचे समोर आले आहे. लग्नाच्या काही महिन्यानंतर नराधम पतीने पत्नीची निर्घृण हत्या करत तिचे अवयव छाटले. सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांसह सर्वांनाच धक्का बसला. २५ वर्षीय पत्नीची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी तिच्या ३० वर्षीय पतीला अटक केली असून त्याने गुन्हा मान्य केला आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर तिचे अवयव छाटून ते फ्रिजमध्ये ठेवण्यात आले होते.

प्रकरण काय आहे?

एनडीटीव्हीने दिलेल्या बातमीनुसार, सदर दाम्पत्याचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. गुवाहाटीच्या हाटीगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका रहिवाशी संकुलात सदर दाम्पत्य राहत होते. स्थानिकांनी दाम्पत्याचे घरातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार दिली होती. तसेच घरात दोन दिवसांपासून कुणीही नसल्याचे सांगितले होते.

पोलिसांनी फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर आतमधील दृश्य पाहून त्यांना धक्का बसला. तिथे शीर नसलेला महिलेचा मृतदेह आढळून आला. महिलेची ओळख रिया तालुकदार असल्याचे सांगितले जाते. महिलेच्या हाताची बोटेही छाटल्याचे दिसून आले. पोलिसांनी मृतदेहाचे शीर शोधल्यानंतर ते घरातील फ्रिजमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून ठेवल्याचे आढळून आले.

पतीला अटक

पोलिसांनी मृतदेह आणि इतर अवशेष शवविच्छेदनासाठी पाठवून दिले. पत्नीची हत्या करणारा पती पोलिसांना शरण आला आहे. त्याने पत्नीची हत्या का केली? याचा तपास केला जात आहे. अतिरीक्त पोलीस उपायुक्त अनुराग शर्मा यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, आरोपी रामानुजन गोस्वामी याला अटक केली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. दाम्पत्याचे सहा महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. दोघेही तेव्हापासून या फ्लॅटमध्ये राहत होते.

श्रद्धा वालकर हत्या प्रकरण काय?

२७ वर्षीय श्रद्धा वालकर हिची तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावाला याने मे २०२२ मध्ये दिल्लीतील मेहरौली येथील फ्लॅटमध्ये गळा दाबून हत्या केली होती. त्यानंतर त्याने तिच्या शरीराचे अनेक तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवले. दिल्लीच्या विविध भागांतील जंगलात हे तुकडे हळूहळू करून फेकले. या धक्कादायक गुन्ह्यानंतर १२ नोव्हेंबर २०२२ रोजी त्याला अटक करण्यात आली होती.