गुवाहाटीमध्ये सोनम वांगचुक यांचे भित्तिचित्र काढणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी शुक्रवारी अटक केली आहे. नवी दिल्लीत जंतरमंतर येथे गेल्या २० दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांना शनिवारी सकाळी आंदोलनस्थळी पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात सक्तीने आंदोलनस्थळावरून हटवून दक्षिण दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले.

काय आहे नेमके प्रकरण?

गुवाहाटीमध्ये शुक्रवारी एका उड्डाण पुलाच्या खांबावर सोनम वांगचुक यांचे मोठे भित्तिचित्र काढण्यात आले होते. पोलिसांनी सांगितले की त्या चित्राच्या संदर्भातही एफआयआर दाखल करण्यात आला असून, ते काढणाऱ्यांची ओळख पटवली जात आहे. गुवाहाटी पूर्व पोलीस दलातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, शुक्रवारी रात्री गस्तीवरील पथकाने एका भिंतीवर रंगकाम करत असलेल्या दोन जणांना ताब्यात घेतले.

“गेल्या काही दिवसांपासून असे दिसत होते की, रात्रीच्या वेळी काही लोक पूल, सरकारी इमारतींच्या भिंती आणि परिसराच्या भिंती यांसारख्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करत आहेत. लोक त्यावर रंगकाम करतात आणि त्या रंगकामाच्या नावाखालीच मालमत्तेचे नुकसान केले जाते. काल रात्री आमच्या गस्त पथकाला ज्योती-विष्णू ऑडिटोरियमकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका भिंतीचे नुकसान करताना दोन तरुण दिसले. ते भिंतीवर विविध रंग लावून तिचे नुकसान करत होते. त्यामुळे आम्ही त्यांना ताब्यात घेतले असून दिसपूर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे,” असे त्यांनी सांगितले. तसेच त्यांची चौकशी केली असता ते सोनम वांगचुक यांचे चित्र काढत असल्याचे त्यांनी सांगितले.

शुक्रवारी शहरातील एका उड्डाणपुलाच्या खांबावर काढलेले एक मोठे भित्तिचित्र सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. हे चित्र गुरुवारी रात्री गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट अँड क्राफ्टच्या विद्यार्थ्यांनी काढल्याचे सांगण्यात येत आहे. हे भित्तिचित्र सोनम वांगचुक यांचे असून त्यावर ‘सेव्ह सोनम वांगचुक’ असे लिहिण्यात आले आहे. या भित्तिचित्राच्या संदर्भातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे.

सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे हा एक ट्रेंड बनत चालला आहे. रात्रीच्या वेळी काही लोकं सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करत आहेत यांची आम्ही ओळख पटवली आहे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांचे आदेश

यापूर्वी शहरातील सुशोभीकरणावेळी झुबीन गर्ग यांचे भित्तिचित्र पुसून टाकल्याने वाद निर्माण झाला होता. त्यामुळे आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिश्व शर्मा यांनी सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना फ्लायओव्हर आणि इतर सार्वजनिक पायाभूत सुविधांवर अनधिकृत चित्रे काढण्यास परवानगी देऊ नये, असे आदेश दिले होते.

सोनम वांगचुक परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटण्याच्या वाढत्या घटनांविरुद्ध आंदोलन करत आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ते बेमुदत उपोषणावर बसले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर CJP चे संस्थापक अभिजित दिपके हे जंतरमंतरवर उपोषणाला बसले आहेत.