Guwahati University Student Death Investigation Updates: गुवाहाटी विद्यापीठातील एका २२ वर्षीय विद्यार्थिनीचा शहरातील एका होमस्टेमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी तिच्या २६ वर्षीय प्रियकराला ताब्यात घेतले आहे. विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा दावा प्रियकराने केला असला, तरी पोलिसांना हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला आहे. दरम्यान मृत्यूपूर्वी तरुणीने मध्यरात्री आईला फोन करून “हे मला मारून टाकतील” असे सांगितल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केल्याचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे. यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धारापूर येथील रहिवासी आणि गुवाहाटी विद्यापीठात समाजशास्त्राची विद्यार्थिनी असलेली निमिषा ठाकूरिया ही आसिफ अली नावाच्या तरुणासह गराल भागातील एका होमस्टेमध्ये मुक्कामाला होती. शनिवारी पहाटे ती बेशुद्धावस्थेत आढळल्यानंतर तिला तातडीने स्थानिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथून तिला गुवाहाटी मेडिकल कॉलेज व रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.
आत्महत्येचा दावा पोलिसांनी फेटाळला
पश्चिम गुवाहाटीचे पोलीस उपायुक्त बोलिन देवरी यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले की, “संशयित आरोपी आसिफ अली याने निमिषाने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. मात्र आम्ही त्याच्या जबाबावर विश्वास ठेवलेला नाही. प्राथमिक तपासात ही हत्या असल्याचा संशय येत असून सखोल चौकशी सुरू आहे.
मृतदेहावर किंवा घटनास्थळाच्या जमिनीवर रक्ताचे डाग आढळलेले नाहीत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.” या प्रकरणी होमस्टेचे मालक, केअरटेकर आणि इतर कर्मचाऱ्यांचीही कसून चौकशी केली जात आहे.
कौटुंबिक मित्राचा गंभीर आरोप
निमिषाच्या वडिलांचे मित्र गौतम दास यांनी कुटुंबियांच्या वतीने प्रसारमाध्यमांशी बोलताना अनेक धक्कादायक खुलासे केले. दास यांच्या दाव्यानुसार, “निमिषा शुक्रवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास मैत्रिणीकडे जाते असे सांगून घरातून बाहेर पडली होती. रात्री ८ वाजता आईने विचारणा केली असता तिने जेवण झाल्यावर उशीर झाल्यास मैत्रिणीकडेच थांबणार असल्याचे सांगितले. रात्री १० वाजता तिने तिथेच मुक्काम करत असल्याचे पुन्हा सांगितले.”
“मात्र मध्यरात्री सुमारे २ वाजता निमिषाने रडत रडत आईला फोन केला आणि ‘आई, हे मला मारून टाकतील’ अशी भीती व्यक्त केली. ती हे वाक्य पुन्हा उच्चारत असतानाच अचानक फोन हिसकावून घेतला गेला,” असा दावा दास यांनी केला. यानंतर घाबरलेल्या पालकांनी तत्काळ अझारा पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याच दरम्यान पोलिसांना एका आरोग्य केंद्रातून तरुणीला दाखल केल्याची माहिती मिळाली, असेही त्यांनी सांगितले.
मध्यरात्री ओरडण्याचा आवाज, केअरटेकरची माहिती
होमस्टेचा आचारी आणि केअरटेकर बिपुल बैलुंग याने सांगितले की, “रात्रीच्या वेळी एका तरुणाचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला. तो ‘दादा, उठो, उठो’ असे जोरजोरात ओरडत होता. आम्ही बाहेर जाऊन पाहिले तेव्हा काही आढळले नाही. नंतर पुन्हा खोलीकडे गेलो असता तिथून रडण्याचा आवाज येत होता. खोली क्रमांक १० मध्ये एक तरुण जमिनीवर पडलेल्या तरुणीला पकडून रडत असल्याचे दिसले.” त्यानंतर मालकांना बोलावून रुग्णवाहिका मागवण्यात आली, असे त्याने स्पष्ट केले.
परिसरात तणावाचे वातावरण
मयत तरुणी हिंदू आणि तिचा प्रियकर मुस्लीम असल्याने या घटनेनंतर स्थानिक पातळीवर काही संघटनांनी तीव्र निदर्शने केली. यामुळे काही काळ तणाव निर्माण होऊन रास्ता रोको करण्यात आला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांची समजूत काढल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
