Gwalior Divorce Fraud Case Wife Cheats Court: गेल्या काही वर्षांमध्ये घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. वेगवेगळ्या कारणांसाठी घटस्फोट घेतल्याची वा घटस्फोटाची मागणी करणारी प्रकरणं देशभरातल्या न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत. पण अनेक ठिकाणी ही प्रकरणं म्हणजे एका बाजूने दुसऱ्या बाजूवर अन्यायकारक पद्धतीने लादलेले आरोपच असल्याचंही सुनावणीतून स्पष्ट होतं. पण ग्वाल्हेरमध्ये समोर आलेल्या एका अजब प्रकरणात पत्नीनं चक्क न्यायालयालाच फसवून पतीपासून घटस्फोट मिळवल्याचं स्पष्ट झालं आहे. पतीचं दुसरं लग्न झाल्याचा दावा करण्यासाठी पत्नीनं चक्क पतीचा त्याच्या सख्ख्या बहिणीसोबतचा फोटोच न्यायालयात सादर केला!

नेमकं घडलं काय?

मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमधला हा सगळा प्रकार आहे. एका महिलेनं कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. आपल्या पतीनं दुसरं लग्न केल्याचा दावा या महिलेनं केला होता. विशेष म्हणजे आपल्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ सदर महिलेनं पतीचा दुसऱ्या एका महिलेसोबतचा फोटोदेखील न्यायालयाला सादर केला होता. सादर झालेले पुरावे व महिलेचा युक्तिवाद या आधारावर न्यायालयानेदेखील फक्त महिलेच्या याचिकेवर घटस्फोट मंजूर केल्याचा निकाल देऊन टाकला. पण नंतर खरा प्रकार समोर आला आणि सगळ्यांनाच धक्का बसला!

१९९८ साली सदर महिलेचा विवाह झाला होता. कौटुंबिक वादांमुळे लग्नाच्या १७ वर्षांनंतर म्हणजे २०१५ सालापासून ते दोघे एकमेकांपासून स्वतंत्र राहात आहेत. पण असं असलं, तरी पतीने घटस्फोट देण्यास नकार दिल्यामुळे सदर महिलेनं २०२१ साली घटस्फोटासाठी ग्वाल्हेरच्या कुटुंब न्यायालयात याचिका साद केली होती. पतीनं दुसरं लग्न केल्याचा दावा महिलेनं न्यायालयासमोर केला. पुराव्यादाखल तिने दिलेल्या फोटोमध्ये पतीसोबत त्याची दुसरी पत्नी असल्याचंही तिने नमूद केलं. पण प्रत्यक्षात पतीसोबत त्याची सख्खी बहीण आणि इतर कुटुंबीय त्या फोटोत होते. कुटुंब न्यायालयाने नुकताच सदर महिलेला घटस्फोट मंजूर केला.

…आणि पतीला घटस्फोटाबाबत समजलं!

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संबधित पतीला कुटुंब न्यायालयाने घटस्फोट मंजूर करण्याच्या दिलेल्या आदेशांबाबत समजलं. याबाबत अधिक चौकशी केली असता आपल्या पत्नीने बहिणीसोबतचा आपला फोटो न्यायालयासमोर दुसरं लग्न झाल्याच्या दाव्यासाठी सादर केल्याचा धक्कादायक प्रकार पतीला समजला. यानंतर पतीने कुटुंब न्यायालयाच्या आदेशांविरोधात ग्वाल्हेर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पत्नीने न्यायालयाची फसवणूक करून घटस्फोट मिळवल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयात अद्याप सुनावणी सुरू झालेली नसून या सुनावणीत संबंधित घटस्फोटाच्या वैधतेवर सविस्तर युक्तिवाद होण्याची शक्यता आहे.