देशातील निवडणूक आयोगाच्या कामकाजावरून आधीच राजकीय वातावरण तापलेले असताना आता एक नवा मोठा वाद निर्माण झाला आहे. “केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मला भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती,” असा खळबळजनक दावा केरळचे माजी मुख्य सचिव जिजी थॉम्पसन यांनी केला आहे. या दाव्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आणि सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

विमानात झाली होती भेट; थॉम्पसन यांचा दावा काय?

माजी सनदी अधिकारी जिजी थॉम्पसन यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१६ मध्ये दिल्लीला जाणाऱ्या एका विमानातील प्रवासादरम्यान हा प्रकार घडला होता. त्यावेळी ज्ञानेश कुमार हे सनदी सेवेत (IAS) कार्यरत होते.

“माझे मित्र असलेले ज्ञानेश कुमार यांनी मला विचारले की, ‘नजीकच्या काळात निवृत्त झाल्यावर तुमची काय योजना आहे?’ त्यावर मी मुलांसाठी एका प्रकल्पावर काम करण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु, त्यांनी मला केरळमधील पठाणमथिट्टा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याचा, खासदार होण्याचा आणि नंतर मंत्री होण्याचा सल्ला दिला,” असा खुलासा थॉम्पसन यांनी केला. मात्र, आपण ही ऑफर तात्काळ नाकारल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ज्ञानेश कुमार हे १९८८ च्या बॅचचे केरळ कॅडरचे आयएएस अधिकारी असून त्यांनी जानेवारी २०२४ मध्ये प्रशासकीय सेवेतून निवृत्ती घेतली होती.

‘आधी भाजपासाठी भरती, नंतर मॅच फिक्सिंग’; राहुल गांधींची जोरदार टीका!

थॉम्पसन यांच्या या दाव्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘X’वरून (पूर्वीचे ट्विटर) केंद्र सरकारवर आणि ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

“आधी शासकीय सेवेत असताना ज्ञानेश कुमार यांचा वापर भाजपाकडे उमेदवार आणण्यासाठी (रिक्रूटमेंट) केला गेला. त्यानंतर मोदी आणि शाह यांनी त्यांना पंच (अंपायर) बनवून भारताच्या निवडणुकांचे ‘मॅच फिक्सिंग’ करण्याचे काम सोपवले,” असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला.

केरळ काँग्रेसनेही या मुद्द्यावरून प्रश्न उपस्थित करत विचारले आहे की, एका सेवाभावी सनदी अधिकाऱ्याला भाजपच्या तिकिटाची ऑफर देण्याचे अधिकार कोणी दिले होते आणि कार्यरत असताना ते या विषयावर कशी काय चर्चा करत होते?

मात्र, थॉम्पसन यांच्या विधानावरून ज्ञानेश कुमार यांनी नंतरच्या काळात निवडणुकांमध्ये फेरफार किंवा हस्तक्षेप केला, असा थेट पुरावा मिळत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

निवडणूक आयोगाच्या अंतर्गत मतभेदांमुळे आधीच वाद

हा नवा दावा अशा वेळी समोर आला आहे, जेव्हा मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेवरून निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या एका तपास अहवालानुसार, ऑक्टोबर २०२५ ते ऑगस्ट २०२६ दरम्यान निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी निवडणूक आयोगाच्या अनेक निर्णयांवर तब्बल १४ वेळा लेखी आक्षेप नोंदवले होते. मतदार नोंदणी, नाव वगळणे आणि ऑनलाइन अर्ज क्र. ६ मधील अटी यांवर हे मतभेद होते.

निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण:

निवडणूक आयोगाने यावर स्पष्टीकरण देताना सांगितले आहे की, तीन सदस्यीय संस्थेत मतभेद असणे ही नैसर्गिक बाब आहे. परंतु, मतदार यादी पुनरीक्षणासह (SIR) सर्व अंतिम निर्णय सर्वसंमतीनेच घेण्यात आले आहेत. तसेच फॉर्म ६ मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.