केरळमधील २००० च्या काळातील एका जुन्या प्रकरणाला आता सनसनाटी वळण आलं आहे. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर लाचखोरी आणि गंभीर गैरव्यवहाराचे आरोप झाल्यानंतर केरळ सरकारनं याप्रकरणी प्राथमिक चौकशीचे आदेश दिले आहेत. मलेशियन अभियंत्याच्या आत्महत्येशी जोडलेल्या २ कोटी रुपयांच्या लाचखोरीच्या प्रकरणामुळं राजकीय वर्तुळात मोठं वादळ निर्माण झालं आहे. ‘द इंडियन एक्सप्रेस’ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

२००६ मध्ये ज्ञानेश कुमार हे केरळ राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव म्हणून कार्यरत होते. त्यावेळी रस्ते विकास प्रकल्पाचे काम करणाऱ्या भारत-मलेशिया संयुक्त कंपनीतील प्रोजेक्ट मॅनेजर आणि मलेशियन व्यावसायिक ली सी बीन यांनी नोव्हेंबर २००५ मध्ये मलेशियात आत्महत्या केली होती.

सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांची थकबाकी मंजूर करण्यासाठी लाच मागितली आणि बिले अडकवून ठेवली, असा आरोप ली यांच्या आत्महत्येनंतर समोर आला होता. ली यांच्या सुसाईड नोटमध्ये ज्ञानेश कुमार यांच्या नावाचा उल्लेख असल्याचा दावा आता पुन्हा एकदा करण्यात आला आहे.

२ कोटींची लाच अन् कंत्राटदाराचा गंभीर दावा

या प्रकरणात ‘साजन’ नावाच्या कंत्राटदाराने केरळच्या गृह मंत्रालयाकडे नवीन तक्रार दाखल केली आहे. साजन हे PATI-BEL कंपनीसाठी साहित्य पुरवठादार म्हणून काम करत होते.

“थकबाकीची बिले मंजूर करण्यासाठी ज्ञानेश कुमार यांनी २ कोटी रुपयांची लाच मागितली होती, असे ली यांनी मला स्वतः सांगितले होते. मात्र, कंपनी लाच देण्यास तयार नव्हती. बिले अडकल्यामुळे स्थानिक कंत्राटदार आणि पुरवठादारांचे पैसे वेळेवर देता आले नाहीत, ज्यामुळे प्रचंड मानसिक तणावाखाली येऊन ली यांनी आत्महत्या केली,” असा थेट दावा साजन यांनी केला आहे. तसेच, सरकार तपास करण्यास तयार असेल, तर ली यांच्या कुटुंबाला आणि आवश्यक ते पुरावे तपास अधिकाऱ्यांसमोर सादर करण्यास तयार असल्याचेही साजन यांनी स्पष्ट केले आहे.

विजिलन्स आणि अँटी-करप्शन ब्युरोकडून प्राथमिक चौकशी

काँग्रेस नेते वेणुगोपाल यांनी गृहमंत्री रमेश चेन्निथला यांच्याकडे तक्रार केल्यानंतर ‘विजिलन्स अँटी-करप्शन ब्युरो’ने (VACB) या प्रकरणाची दखल घेतली आहे. २००६ मध्ये झालेला तपास बाह्य दबावामुळे घाईघाईने बंद करण्यात आला होता, असा आरोप वेणुगोपाल यांनी केला आहे.

गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार, याप्रकरणी एफआयआर नोंदवायचा की नाही, याचा निर्णय VACB च्या प्राथमिक चौकशीनंतर आणि कायदेशीर सल्ल्यानंतर घेतला जाईल.

गृहमंत्री चेन्निथला यांचे विधानसभेतील स्पष्टीकरण काय?

विधानसभेत बोलताना गृहमंत्री रमेश चेन्निथला यांनी सांगितले की, २००६ च्या काळात ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळातील ७६ कामांच्या निविदा प्रक्रियेबाबत यापूर्वी दक्षता चौकशी झाली होती. मात्र, त्यावेळी कोणतेही ठोस पुरावे न मिळाल्याने VACB ने ही चौकशी बंद करण्याचा अहवाल दिला होता. २०१२ मध्ये न्यायालयानेही हा अहवाल स्वीकारला होता.

मात्र, मलेशियन अभियंत्याची सुसाईड नोट अद्याप सार्वजनिक झालेली नसल्याने आणि नव्या तक्रारींमध्ये थेट नाव आल्याने विजिलन्स ब्युरो आता पुन्हा एकदा जुन्या फायलींची झाडाझडती घेण्याच्या तयारीत आहे. या चौकशीमुळे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढतात की त्यांना दिलासा मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.