Rahul Gandhi Gyanesh Kumar Modi Shah Investigation Demand: भारतीय निवडणूक आयोगातील तीन आयुक्तांपैकी दोन आयुक्तांचा विरोध डावलून मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मनमानी पद्धतीने निर्णय घेतल्याचे वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिल्यानंतर देशभरात खळबळ उडाली. यानंतर विरोधकांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. तसेच लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि कांग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत ज्ञानेश कुमार आणि केंद्रातील एनडीए सरकारवर जोरदार टीका केली.
‘ज्ञानेश कुमारांनी माफीचा साक्षीदार व्हावे’
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्तांची तक्रार करणाऱ्या दोन इतर आयुक्तांचे कौतुक करताना त्यांनी योग्यच केल्याचे म्हटले. ज्ञानेश कुमार यांनी देशाच्या विरोधात काम केले असून ते राष्ट्रद्रोही आहेत. त्यांनी माफीचा साक्षीदार होऊन चौकशीला सामोरे जावे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.
पंतप्रधान मोदी, अमित शाहांची चौकशी होणार
राहुल गांधी पुढे म्हणाले, “आमच्या पक्षाने स्वातंत्र्याची लढाई लढली आहे. आम्ही या प्रकरणात शांत बसणार नाही. राष्ट्रद्रोह्यांना नक्कीच शिक्षा केली जाईल. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर भविष्यात कधीतरी या राष्ट्रद्रोह्यांना सोडले जाणार नाही. काँग्रेस पक्षाकडे याची संपूर्ण माहिती आहे. मी देशातील जनतेला वचन देतो की, पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांची चौकशी होणार.”
अमित शाहांच्या व्हिडीओ पत्रकार परिषदेची सुरुवात
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांचे काही व्हिडीओ दाखवले. ज्यामध्ये अमित शाह अनेक दशके भाजपा सत्तेत राहिल, असा दावा करत आहेत. हा व्हिडीओ दाखविल्यानंतर राहुल गांधी म्हणाले, “भारताने बांगलादेशचे युद्ध जिंकल्यानंतर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी प्रसिद्धीच्या शिखरावर होत्या. तरीही दोन वर्षांनंतर झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. अटल बिहारी वाजपेयी, राजीव गांधी यांनाही पराभव पाहावा लागला होता. मग भाजपाचाच विजय कसा काय होत आहे?”
राहुल गांधी यांनी अँटी इन्कम्बन्सीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, मी ५० वर्षांपासून राजकारण पाहत आहे. लोकशाहीत कोणताही नेता मोठ्या काळापर्यंत सत्तेत राहण्याचा दावा करू शकत नाही. याआधी अनेक मातब्बर नेत्यांनाही पराभव सहन करावा लागला. मग भाजपा आणि नरेंद्र मोदींच्या विरोधातील अँटी इन्कम्बन्सी कुठे गेली? गुजरात किंवा इतर ठिकाणी ते कसे काय जिंकत आहेत?
भाजपा सरकारने केलेले कायदेही अवैध – राहुल गांधी
“मत चोरी झाल्यामुळे कायदेही अवैध ठरत आहेत. कारण जर मताचा अधिकारच हिरावला जात असेल तर कायदे बनविणारी यंत्रणाही उद्ध्वस्त होत आहे. जर मत चोरी झाली आहे, तर संसदेत तयार केलेले कायदेही अवैध ठरतात. कारण ते मत चोरीच्या आधारावर तयार केलेले आहेत”, असाही आरोप राहुल गांधी यांनी केला.
