लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली/मुंबई : केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्षांनी रस्त्यावर उतरण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने या मुद्द्यावर सोमवारी देशभर निदर्शने केली तर, कॉक्रोच जनता पार्टीने दिल्ली आणि मुंबईत शुक्रवारी ‘जंतर-मंतर २.०’ करत ‘जेलभरो’चा इशारा दिला आहे.
इंडिया आघाडीची बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली असून उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू मंगळवारी आपल्या पक्षांची आंदोलन दिशा जाहीर करणार आहेत. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरून वातावरण तापत असताना भाजप नेते जे. पी. नड्डा यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटविण्याच्या मागणीवर विरोधक आग्रही आहेत. कॉक्रोच जनता पार्टीने गांधी जयंतीच्या दिवशी शिवाजी पार्कमध्ये सभा घेण्याचे नियोजन केले होते. पण मुंबई पोलिसांनी या सभेला परवानगी नाकारली आहे. तरीही शिवाजी पार्कवर आंदोलन करण्यावर पक्षाचे नेते अभिजित दिपके हे ठाम आहेत. पोलिसांनी सभेला परवानगी नाकारली असली तरी ‘ज्ञानू मस्ट गो’ या नावाने करण्यात येणार्या आंदोलनांतर्गत शुक्रवारी सायंकाळी चार वाजता ‘जेल भरो’ आंदोलन करण्याचा इशारा दिपके यांनी दिला आहे.
दिल्लीत, ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण, ‘एआयएसए’ या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष नेहा बोरा व इतर आंदोलक नेत्यांनी सोमवारी संसद मार्ग पोलिसांना आंदोलनाची आगाऊ सूचना दिली. या आंदोलनाला पोलिसांनी अजून परवानगी दिलेली नाही. ‘आयोगाने शनिवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून ‘एसआयआर’ आणि इतर चुकांची कबुली दिली आहे. त्यामुळे आम्ही २ ऑक्टोबरला जंतर-मंतरवर आंदोलन करू,’ असे प्रशांत भूषण म्हणाले तर, नेहा बोरा यांनी ‘पोलिसांची परवानगी मागण्यासाठी नव्हे तर, त्यांना आंदोलनाची सूचना देण्यासाठी आलो आहोत’ असे माध्यमांना सांगितले.
ठाकरेंची आज, ‘इंडिया’ आघाडीची उद्या बैठक
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी कार्यकारिणी समितीची बैठक बोलावली आहे. त्यात निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलनाची पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे. त्यानंतर बुधवारी नवी दिल्लीतील कॉ्स्टिटट्यूशन क्लबमध्ये ह्य्इंडियाह्ण आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक होईल. विरोधी पक्षांकडून ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्यासाठी महाभियोगाचा नवा प्रस्ताव आणला जाणार आहे. या प्रस्तावासंदर्भात दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्ष सदस्यांच्या स्वाक्षर्या घेण्यासंदर्भात बैठकीत चर्चा होणार आहे.
ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात शिवसेना व मनसेच्या वतीने येत्या रविवारी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची घोषणा करण्याकरिता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद उद्या दादरमधील राज ठाकरे यांच्या निवासस्थानी होणार आहे. या मोर्चात काँग्रेससह इंडिया आघाडीतील अन्य घटक पक्षांनी सहभागी होण्याचे आवाहन ठाकरे बंधूंनी केले आहे.
