मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलनाची हाक दिली आहे. मात्र त्याआधीच अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना दिल्ली पोलिसांनी विमानातून ताब्यात घेतलं आहे. दरम्यान या सगळ्या घडामोडी दिल्लीत घडत असतानाच राहुल गांधी यांनी एक सूचक पोस्ट लिहिली आहे. ज्याबाबत आता सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

काय आहे राहुल गांधींची पोस्ट?

ज्ञानेश कुमार जाणार, मोदी सरकार जाणार आणि त्यानंतर लोकशाहीची पुनर्बांधणी करण्यास सुरूवात करणार अशी सूचक पोस्ट राहुल गांधी यांनी केली आहे. तसंच एका भाषणाची क्लिपही त्यांनी आपल्या पोस्टसह जोडली आहे. इंडिया ब्लॉकसाठी त्यांनी हे भाषण केलं होतं. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या खासदारांनी तीन ते चार दिवस दिल्लीतल्या वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. गुरूवारी राजघाट या ठिकाणी त्यांनी शांततेच्या मार्गाने ठिय्या आंदोलन करून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दरम्यान आता त्यांनी जी पोस्ट केली आहे ती सूचक आहे. नेमकं या सगळ्या आंदोलनांनंतर काय घडणार याची चर्चा आता राहुल गांधींच्या पोस्टमुळे सुरू झाली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

२००४ आणि २०१४ या वर्षांमध्ये काय बदललं?

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी भारतच्या स्वातंत्र्य दिनादिवशी केलेल्या भाषणाचा संदर्भ दिला. गेल्या चार दिवसात संसदेच्या विरोधी पक्षांच्या खासदारांनी तीन चार दिवसात केलेल्या आंदोलनाबाबत आभार मानतो, असं राहुल गांधी म्हणाले. मी राजकारणात २००४ मध्ये आलो, तेव्हा देश लोकशाही आणि स्वतंत्र देश होता. २०१४ मध्ये आपल्याला समजलं नाही, देशात काहीतरी मुलभूत बदल झाला आहे. हेच तुम्ही पाहाल, हे सिद्ध झालंय आणि प्रत्येक भारतीयाला माहिती आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं.

मी लहान होतो तेव्हा मला शिकवण्यात आलं होतं…

मी लहान असताना मला शिकवलं गेलं, मनात रुजवलं गेलं की तुझ्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट प्रत्येक भारतीयाचं अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य करणं ही आहे. मला प्रत्येक राज्यांची नावं, राजधानींची नावं शिकवण्यात आली. भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या अभिव्यक्ती स्वातत्र्यांचं रक्षण करणं महत्त्वाचं आहे, हे मला शिकवण्यात आलं. त्यामुळंच मी राजकारणात आलो, असं राहुल गांधी म्हणाले.