scorecardresearch

ज्ञानवापी मशिदीचं सर्वेक्षण पूर्ण; मशिद परिसरातील विहिरीत शिवलिंग सापडल्याचा दावा

महिलांच्या एका समूहाने या मशिदीच्या बाहेरील भिंतीलगत असलेल्या देवतांच्या मूर्तीची पूजा करण्याची परवानगी मागण्यासाठी स्थानिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी सुरू आहे.

gyanvapi masjid
दोन दिवसांमध्ये मशिदीचं सर्वेक्षण पूर्ण झालं (फाइल फोटो)

वारासणीमधील ज्ञानवापी मशिदीचे चित्रीकरणाद्वारे सर्वेक्षण रविवारी शांततेत पूर्ण झाले. सर्वेक्षणाचा आजचा दुसरा दिवस असून उर्वरित कामही आज पूर्ण झाले आहे. रविवारपर्यंत ६५ टक्के आणि उर्वरित सर्वेक्षण आज म्हणजेच सोमवार, १६ मे रोजी पूर्ण झाले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार हे कामकाज सुरू असल्याची माहिती देण्यात आलीय. विशेष म्हणजे या सर्वेक्षणादरम्यान शिवलिंग सापडल्याचा दावा न्यायालयामध्ये हिंदूंची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी केलाय.

या सर्वेक्षणासंदर्भात इंडिया टुडेच्या आज तक या वृत्तवाहिनीशी बोलताना या प्रकरणामध्ये हिंदूंची बाजू मांडणारे वकील विष्णू जैन यांनी मोठा दावा केलाय. फोनवरुन दिलेल्याम माहितीमध्ये विष्णू जैन यांनी मशिदीच्या परिसरात असणाऱ्या विहिरीमध्ये शिवलिंग सापडल्याचा दावा केलाय. या शिवलिंगाच्या संरक्षण आणि जतन केलं जावं या मागणीसाठी आपण स्थानिक न्यायालयामध्ये अर्ज करणार असल्याचंही जैन म्हणाले.

जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार हे शिवलिंग १२ फूटांचे असल्याची माहिती देण्यात आलीय. हिंदूंची बाजू मांडणारे दुसरे वकील मदन मोहन यादव यांनी हे शिवलिंग म्हणजे नंदीचा चेहरा असल्याचा दावा केलाय.

गेल्या आठवडय़ात या मशिदीच्या व्यवस्थापन समितीने आक्षेप घेतल्यानंतर हे सर्वेक्षण थांबले होते. सर्वेक्षणासाठी न्यायालयाने नियुक्त केलेल्या विधि आयुक्तांना आवारात चित्रीकरण करण्याचा अधिकार नसल्याचा दावा या व्यवस्थापन समितीने केला होता, मात्र न्यायालयाच्या परवानगीने हे सर्वेक्षण सुरू झाले. महिलांच्या एका समूहाने या मशिदीच्या बाहेरील भिंतीलगत असलेल्या देवतांच्या मूर्तीची पूजा करण्याची परवानगी मागण्यासाठी स्थानिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी सुरू आहे.

रविवारी आणि सोमवारी या मशिदीची पाहणी कडक सुरक्षेत सकाळी आठ ते दुपारी बारापर्यंत केली गेली. याविषयी वाराणसीचे जिल्हाधिकारी कौशलराज शर्मा यांनी सांगितले की, न्यायालयाने नियुक्त केलेल्या तीन विधि आयुक्तांसह सर्व पक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश आलेल्या न्यायालयीन आयोगाने सकाळी आठला ही पाहणी सुरू केली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gyanvapi masjid survey over shivling found in well says lawyer scsg

ताज्या बातम्या