वाराणसी : ज्ञानवापी मशिदीत ज्या ठिकाणी कथित शिवलिंग सापडले तो भाग सर्वासाठी प्रतिबंधित करा, असे आदेश सोमवारी येथील न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला दिले. न्यायालयीन आदेशानुसार या मशिदीचे चित्रीकरण सर्वेक्षण सोमवारी करण्यात आले. त्यावेळी कथित शिवलिंग सापडल्याचे सांगण्यात येते. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवाणी न्यायाधीश रविकुमार दिवाकर यांनी वाराणसी जिल्हा प्रशासन, पोलीस आयुक्त आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या प्रमुखांना या प्रतिबंधित क्षेत्राच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्याचे आदेश दिले. ही मशीद काशीविश्वनाथ मंदिरालगत असून, तिच्या बाह्य भिंतीजवळील देवतांची दैनंदिन पूजा करण्यासाठी महिलांच्या एका समूहाने परवानगीसाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यानुसार हे सर्वेक्षण गेल्या तीन दिवसांपासून सुरू होते. आज सकाळी आठपासून ते सव्वादहापर्यंत सर्वेक्षण करण्यात आले.

न्यायालयाने नियुक्त केलेल्या आयोगाने दोन तासांनंतर सकाळी सव्वा दहाला सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले. सर्वेक्षणाच्या कामकाजावर सर्व पक्षीयांनी समाधान व्यक्त केल्याचे वाराणसीचे जिल्हाधिकारी कौशलराज शर्मा यांनी पत्रकारांना सांगितले. हिंदूंचे वकील मदनमोहन यादव यांनी असा दावा केला आहे, की मशिदीत नमाजाआधी हात धुण्याचे स्थळ म्हणजे ‘वझुखाना’ येथे सर्वेक्षण पथकाला शिवलिंग दिसले. यादव यांनी अन्य ज्येष्ठ वकील हरिशंकर जैन यांच्या येथील दिवाणी न्यायालयात या शिवलिंगाचे संरक्षण व्हावे, अशी मागणी करणारी याचिका दाखल केल्याचे सांगितले. मात्र, जिल्हाधिकारी शर्मा यांनी प्रसारमाध्यमांना आवाहन केले आहे, की या सर्वेक्षणाचा गोपनीय अहवाल फक्त न्यायालयाला उपलब्ध केला जाईल. त्याच्या तपशिलाबाबत अधिकृत माहितीवर प्रसारमाध्यमांनी भर द्यावा.

जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले, की १५ मे रोजी जेव्हा या सर्वेक्षणाचे काम संपले, तेव्हा १६ मे रोजी हे उर्वरित काम पुन्हा करण्याचे ठरले होते. आज सुमारे सव्वादोन तासांनंतर हे सर्व सर्वेक्षण पूर्ण झाले. सर्वपक्षीयांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले. या कामकाजाविषयी ते समाधानी आहेत. न्यायालयात आता या कामकाजाचा तपशील सादर करण्यात येईल.

या कामकाजादरम्यान काशीविश्वनाथ मंदिराचे चौथे प्रवेशद्वार भाविकांसाठी बंद करण्यात आले होते. अन्य प्रवेशद्वारांतून त्यांची व्यवस्था केली होती. विधिआयुक्तांनी या सर्वेक्षणाचा अहवाल १७ मे रोजी न्यायालयाला सादर करण्यात येईल, असे सांगितले आहे. तोपर्यंत या सर्वेक्षणात काय निदर्शनास आले, याचा तपशील गोपनीय ठेवण्याची त्यांची सूचना होती. मात्र, जर कोणी त्याचा भंग करून हा तपशील स्वत:हून जाहीर करत असेल, तर त्याची विश्वासार्हता सिद्ध करता येणार नाही. ही गोपनीय माहिती न्यायालयाकडेच राहील. ही माहिती सर्वाना सांगणाऱ्यांविषयी न्यायालयीन आयोगाचा काही संबंध नसेल.

सदस्यावर कारवाई?

आयोगाच्या कामकाजादरम्यान सर्वेक्षण पथकातील सदस्याला वगळण्यात आले होते का? असे विचारले असता जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले की एका सदस्याला १५-२० मिनिटांसाठी वगळल्यानंतर पुन्हा कामकाजात सहभागी करून घेतले गेले, अशी माहिती आम्हाला मिळाली होती. न्यायालयाने घालून दिलेल्या गोपनीयतेचा भंग करून या सदस्याने बरीच माहिती उघड केली होती. त्यामुळे  कारवाई करण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयात याचिका

नवी दिल्ली : वाराणसीतील ज्ञानवापी-श्रृंगार गौरी संकुलाचे सर्वेक्षण करण्याच्या निर्णयाविरोधात ज्ञानवापी मशिदीच्या व्यवस्थापनाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. व्यवस्थापनाच्या याचिकेवर न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांच्या खंडपीठापुढे आज, मंगळवारी सुनावणी होणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gyanvapi mosque case court orders sealing of spot after petitioner claims finding of shivling zws
First published on: 17-05-2022 at 02:22 IST