Gym Owner Murder : राजधानी दिल्लीतल्या ग्रेटर कैलाश या विभागात असलेल्या जिम मालकाची लॉरेन्स बिश्नोई गँगने हत्या केल्याचा संशय आहे. ग्रेटर कैलाशमध्ये असलेल्या जिमचा मालक नादिर शाह याची दोन अज्ञातांनी गुरुवारी रात्री हत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी निलेश तिवारी, विशाल वर्मा, आकाश यादव आणि नवीन बालियान या चौघांना अटक केली आहे. जिम मालकाच्या हत्येने दिल्ली पुन्हा एकदा हादरली आहे.

नेमकं काय प्रकरण आहे?

जिम मालक नादिर शाह आणि कुणाल छाबडा हे दोघंही व्यावसायिक भागीदार होते. कुणाल छाबडा दिल्लीत अनेक बेकायदेशीर कॉल सेंटर्स चालवतो. कुणाल छाबडा दुबईत आहे. त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट निघाला आहे. कुणाल छाबडाकडे लॉरेन्स गँगने पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. मात्र नादिर शाह याने कुणालला हे पैसे देण्यास नकार दिला. ज्यानंतर नादिर शाह हा लॉरेन्स गँगच्या रडारवर आला. त्यातूनच त्याची हत्या केली गेली असावी अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

नादिर शाह याच्या हत्येचा दुसरा पैलूही समोर

नादिर शाह याच्या हत्येचा दुसरा पैलूही पोलीस तपासत आहेत. नादिर शाह आणि दक्षिण दिल्लीतले गँगस्टर रवि गंगवाल आणि रोहित चौधरी यांची चांगली मैत्री होती. या दोघांची आणि दिल्लीतल्या उत्तर भागातील गँगस्टर हाशिम बाबा यांच्यात हाडवैर होतं. बिश्नोई गँगने हाशिम बाबाशी संपर्क करुन त्याच्याकडून ही हत्या घडवून आणली असाही संशय आहे. नादिर शाह याची हत्या करण्यासाठी आझमगढ या ठिकाणाहून शूटर्स पाठवण्यात आले होते. हाशिम बाबा तिहार तुरुंगात आहे, तिथून समीर बाबाच्या मार्फत ही हत्या घडवण्यात आली. तिहार तुरुंगात असलेल्या समीर बाबाने एकदा नादिरला धमकी दिली होती. मात्र काही उपयोग झाला नाही त्यानंतर आझमगढहून शूटर्सना बोलवण्यात आलं आणि नादिर शाह याची हत्या करण्यात आली, अशी शक्यताही वर्तवण्यात येते आहे. या पैलूच्या अनुषंगानेही पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हे पण वाचा- विरारच्या पेट्रोलपंप मालकाची हत्या, गुन्हे शाखेच्या पथकाकडून दोन आरोपींना अटक

नेमकं काय घडलं?

दक्षिण दिल्लीतल्या ग्रेटर कैलाश भागातून नादिर शाह चालला होता. त्यावेळी गुरुवारी दोन अज्ञातांनी मोटरसायकलवरुन येत त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. यानंतर नादिर शाह गंभीर जखमी झाला. त्याला याच अवस्थेत मॅक्स रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिथे त्याला मृत घोषित केलं. नादिर शाह याला पाच गोळ्या लागल्या आहेत अशी माहिती डॉक्टरांनी दिली. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.