How Ayatollah Khamenei Was Killed: अमेरिका आणि इस्त्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (८६) यांचा मृत्यू झाला. रविवारी केलेल्या या हल्ल्यात इराणचे अनेक महत्वाचे नेते देखील ठार झाले. अयातुल्ला खामेनी यांनी आसरा घेतलेल्या छुप्या ठिकाणाचा अचूक वेध घेत अमेरिका आणि इस्त्रायलने खामेनींची हत्या केली. खामेनी यांच्या जीवाला धोका असल्याची पूर्ण कल्पना असताना आणि आवश्यक सर्व खबरदारी घेऊन देखील अमेरिका आणि इस्त्रायलने अयातुल्ला यांच्या ठिकाणाचा अचूक शोध घेऊन त्यांना ठार कसं केलं? अमेरिका – इस्त्रायचा संपूर्ण प्लॅन या वृत्ताच्या माध्यमातून जाणून घेऊयात. 

सर्व ट्रफिक कॅमेरे हॅक

फायनान्शीयल टाईम्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, “तेहरानमधील जवळपास सर्व ट्रॅफिक कॅमेरे गेल्या काही वर्षांपासून हॅक करण्यात आले होते. हे कॅमेरे फोटो एन्क्रिप्ट करुन तेल अवीव आणि दक्षिण इस्रायलमधील सर्व्हरवर प्रसारित केले जात होते.” “अनेक कॅमेऱ्यांपैकी एका कॅमेऱ्याच्या अँगलमुळे अधिक फायदा झाला”, अशी माहिती या विषयाशी निगडीत एका व्यक्तीने फायनान्शीयल टाईम्सला दिली. यामुळे लोक गाड्या कुठे पार्क करतायेत? याची माहिती मिळाली तसेच, कडा पहारा असलेल्या कंपाऊंडच्या परिसराची माहितीही समोर आली.

सुरक्षा रक्षकांचीही गोळा केली माहिती

अतिशय जटील माहितीच्या आधारे सुरक्षा रक्षकांची माहितीही गोळा करण्यात आली. सुरक्षा रक्षकांचा पत्ता, त्यांच्या कामाचे तास, कामावर ये – जा करण्यासाठी वापरत असलेला मार्ग, सुरक्षेची आणि वाहतुकीची जबाबदारी कोणाकडे आहे, याचा जवळून अभ्यास करण्यात आला आहे. गुप्तचर भाषेत याला “पॅटर्न ऑफ लाईफ” असे म्हटले जाते. रिअल टाईम डेटा ट्रॅक केल्यामुळे अयातुल्ला खामेनी कोणत्यावेळी त्यांच्या कार्यालयात हजर असतील? कोण – कोण त्यांच्यासोबत असेल? याची अचूक माहिती इस्त्रायल आणि सीआयएला मिळाली. 

मोबाईल टॉवर्सच्या सिग्नलमध्ये अडथळा निर्माण केला

रॉयटर्सने यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, शनिवारी सकाळी तेहरानमध्ये नेत्यांची उच्चस्तरीय बैठक झाल्याची माहिती इस्त्रायली गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. सर्वोच्च नेते खामेने याचठिकाणी असतील अशी खात्री यांमुळे सीआयएला पटली होती. 

पाश्चर स्ट्रीटजवळील सुमारे डझनभर मोबाईल फोन टॉवर्सचे सिग्नलला अडथळा निर्माण होईल अशी सोय इस्रायलने करुन ठेवली होती. यामुळे फोन कॉल केल्यावर देखील ते व्यस्त असल्याचे भासणार होते. इस्त्रायलने गणिती पद्धतीचा अचूक वापर करुन, तांत्रिक विश्लेषणाची मदत घेतल्याचे फायनान्शीयल टाईम्सच्या वृत्तात म्हटले आहे.

स्पॅरो मिसाईलचा वापर

“आम्ही अगोदर त्यांचे डोळे काढले”, असे गुप्तचर यंत्रणेतील एका अधिकाऱ्याने फायनान्शीयल टाईम्सला माहिती देताना सांगितले. जूनमध्ये देखील इराणचे डझनभर शास्त्रज्ञ आणि वरिष्ठ अधिकारी मारले गेले होते. यावेळी देखील तीच पद्धत वापरल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. इस्त्रायलने यावेळी आकाराने लहान विशेष पद्धतीने तयार करण्यात आलेली ‘स्पॅरो मिसाईल’ वापरल्याचे सांगितले. ही मिसाईल इराणच्या सुरक्षा प्रणालींना चकमा देण्यास सक्षम होती, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. 

सकाळी हल्ला करण्याचा फायदा झाला

अमेरिका आणि इस्त्रायली गुप्तचर यंत्रणांना खामेनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची शनिवारी सकाळी कडा पहारा असलेल्या कंपाऊंडमध्ये बैठक होणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. इस्त्रायलने हॅक केलेले ट्रॅफिक कॅमेरे, मोबाईल टॉवर्स नेटवर्क यामुळे माहिती मिळतच होती शिवाय सीआयएच्या एका व्यक्तीकडून देखील खामेनींच्या बैठकीची गुप्त माहिती मिळाली होती. दरम्यान, या व्यक्तीबाबत सीआयएने बोलण्यास नकार दिल्याचे फायनान्शीयल टाईम्सने म्हटले आहे. रात्रीच्या अंधारात हल्ला करण्यापेक्षा सकाळी हल्ला करण्याचा इस्त्रायला अधिक फायदा झाल्याचे इस्त्रयली लष्कराने म्हटले आहे.