दिल्ली सरकारच्या कथित मध्य धोरण घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडी भोगत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या तब्येतीवरून, डाएटवरून सध्या मोठा गोंधळ चालू आहे. एका बाजूला आप नेते आरोप करत आहेत की, अरविंद केजरीवाल यांचा तुरुंगात छळ होत आहे. त्यांना त्यांचे कुटुंबीय आणि इतर सहकाऱ्यांना समोरासमोर भेटू दिलं जात नाही. त्यांना उच्च मधुमेहाचा (हाय डायबिटीज) त्रास असून तुरुंगात रवानगी झाल्यापासून केजरीवाल यांचं वजनदेखील झपाट्याने कमी होत आहे. त्यांना औषधंदेखील दिली जात नसल्याचा आरोप आपने केला आहे.

दुसऱ्या बाजूला, ईडीनेही केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. केजरीवाल हे तुरुंगात मिठाई, आंबे, साखर, बटाटे खात आहेत. त्यांना मधुमेहाचा त्रास आहे. तरीही त्यांची शुगर वाढावी यासाठी अरविंद केजरीवाल वेगवेगळे प्रयत्न करत असल्याचा आरोप ईडीने केला आहे. रक्तातील शुगर वाढवून त्याद्वारे जामीन मिळवण्याचा प्रयत्न केजरीवाल करत आहेत असा आरोप ईडीने केला आहे. केजरीवालांच्या डाएट आणि आरोग्यावरून आरोप प्रत्यारोप होत असतानाच केजरीवाल यांनी राऊस अव्हेन्यू न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेद्वारे केजरीवाल यांनी न्यायालयाकडे मागणी केली आहे की, त्यांना तिहार तुरुंगात इन्सुलिन दिलं जावं. केजरीवालांच्या या याचिकेवर आज सुनावणी झाली. या सुनावणीवेळी केजरीवाल यांच्या वकिलांनी न्यायालयासमोर कबूल केलं की, तिहार तुरुंगात केजरीवाल यांना मिठाई आणि आंबे देण्यात आले होते.

ईडीच्या आरोपांवर केजरीवाल यांचे वकील न्यायालयासमोर म्हणाले, “तुरुंगात रवानगी झाल्यापासून केजरीवाल यांना एकूण ४८ वेळा घरून जेवण पाठवण्यात आलं. यामध्ये तीन वेळा आंबे पाठवण्यात आले. ८ मार्चपासून त्यांनी आंबे खाल्ले नव्हते. तसेच त्यांना तुरुंगात जी मिठाई पाठवण्यात आली होती ती शुगर फ्री (साखर नसलेली) होती. त्यांनी आतापर्यंत सहा वेळा शुगर फ्री मिठाई खाल्ली आहे. तसेच तुरुंगात त्यांनी केवळ एकदाच आलू-पुरी खाल्ली आहे, जो नवरात्रीचा प्रसाद होता. त्याचबरोबर रक्तातील साखरेचं प्रमाण व्यवस्थित राहावं यासाठी ते १ एप्रिलपासून तुरुंगात चॉकलेट आणि केळी खात आहेत. दरम्यान, ईडीने चहाबद्दल केलेला दावा पूर्णपणे खोटा आहे.” ईडीने दावा केला होता की केजरीवाल तुरुंगात साखर टाकलेला गोड चहा पित आहेत. दरम्यान, दोन्ही पक्षकारांच्या बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने केजरीवाल यांना तुरुंगात इन्सुलिन देण्याबाबतचा निर्णय राखून ठेवला आहे.

हे ही वाचा >> अमेरिकेपाठोपाठ स्कॉटलंडमधून वाईट बातमी, दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

याआधीच्या सुनावणीवेळी ईडीने न्यायालयासमोर म्हटलं होतं की, “केजरीवाल तुरुंगात असे पदार्ध खातायत जे टाईप टू डायबिटीज असलेल्या रुग्णासाठी धोकादायक आहेत. ते दररोज गोड चहा पित आहेत, मिठाई खात आहेत.” ईडीने केजरीवाल यांचा तुरुंगातील १७ दिवसांचा डाएट चार्टदेखील जारी केला होता.