Hafiz Talha Saeed Anti India Speech: लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी हाफिज तलहा सईदने पुन्हा एकदा भारतविरोधी भडकाऊ वक्तव्यं केली आहेत. सईदने जिहाद, मध्ययुगीन मुस्लिम राजवट आणि दिल्लीचा उल्लेख करत पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असिम मुनीर यांची प्रशंसा केली आहे. सईदने अलिकडे केलेल्या विधानांमध्ये त्याने जिहादचे समर्थन करत, शक्य आहे तोपर्यंत जिहादसाठी काम करण्याचा निर्धार बोलून दाखवला. सईदला भारत आणि अमेरिकेने दहशतवादी घोषित केले आहे.
काय म्हणाला हाफिज तलहा सईद?
“आम्ही थोर मोहम्मद पैगंबरांची शपथ घेतली आहे. आम्ही जिवंत असेपर्यंत आणि आमच्यात शक्ती असेपर्यंत आम्ही हा जिहाद सुरुच ठेऊ आणि आमचे बलिदान देत राहू”, असे हाफिज तलहा सईद म्हणाले. सईदने यावेळी इतिहासाचे संदर्भ दिले. सईदने भारत आणि सभोवतालच्या भागात असणाऱ्या मुस्लिम शासकांचा दाखला देत सध्या भारतीय नेतृत्व आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. “या उपखंडात मुस्लिमांनी ५०० वर्षे राज्य केले”, असा दावा सईदने केला.
भारतीय नेतृत्वावर टीका
हाफिज तलहा सईदने यावेळी दिल्लीचा उल्लेख केला आणि भारतीय नेते कोणत्या संदर्भाने पाकिस्तानवर बोलतात असेही वक्तव्य केले. “दिल्लीतील पाकिस्तानविरोधी सत्ताधारी कशाच्या आधारे बोलतात? दिल्लीचा इतिहास कोणाशी निगडीत होता याचा त्यांना विसर पडलाय का? भारताचा भूभागही कोणाशी निगडीत होता. दिल्ली कोणाची होती? हिंदमधील भूभाग कोणाचे होते?”, असे सईद म्हणाला. “मी इतिहासाशी विरोधाभास दर्शवणारे वक्तव्य करत नाहीये किंवा चुकीचे बोलत नाही किंवा तथ्यविरोधी बोलत नाहीये”, असेही सईद म्हणाला.
पाकिस्तानी लष्करप्रमुख असिम मुनीर यांचे कौतुक
हाफिज सईदने यावेळी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांचे कौतुक केले. “मी अल्लाहचे आभार मानतो की त्याने पाकिस्तानला असे लष्करप्रमुख आणि फील्ड मार्शल दिले आहेत, जे कुराणचे हाफिज आहेत,” असे सईद म्हणाला. सईदने अलिकडेच झालेल्या पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि तुर्कियेमध्ये झालेल्या संरक्षण करारचेही स्वागत केले.
