गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या कन्येच्या विवाहासाठी सरकार २५ हजार रुपये आर्थिक मदत देईल, अशी घोषणा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शुक्रवारी येथे केली.
पुढील पीक योग्य प्रकारे येईपर्यंत ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. जेव्हा नैसर्गिक आपत्ती येईल तेव्हा सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
यापूर्वी २१२७ कोटी रुपयांचा पीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांचे ५० टक्क्यांहून अधिक पीक वाया गेले आहे त्यांची कर्जवसुली स्थगित करण्यात आली आहे. पुढील पीक येईपर्यंत या शेतकऱ्यांना एक रुपया प्रतिकिलो दराने गहू आणि तांदूळ उपलब्ध करून दिला जाईल, असेही ते म्हणाले.
एखाद्या शेतकऱ्याला पिकाच्या नुकसानीच्या पाहणीबद्दल हरकत असल्यास त्या शेतकऱ्याच्या नुकसानीची पुन्हा पाहणी केली जाईल, असेही चौहान यांनी स्पष्ट केले.