RSS chief Mohan Bhagwat Statement On Maharana Pratap Haldighati Battle: ऐतिहासिक हल्दीघाटीच्या (हळदीघाट) लढाईत महाराणा प्रताप यांनीच मुघल सैन्याचा दारूण पराभव केला होता, असा मोठा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला आहे. राजस्थानमधील उदयपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. सरसंघचालकांच्या या विधानामुळे इतिहासकारांनी मांडलेले दावे आणि प्रत्यक्ष वास्तव यावर पुन्हा एकदा नवीन चर्चा सुरू झाली आहे.

इतिहासातील नोंदीनुसार, १८ जून १५७६ रोजी मेवाडचे राजे महाराणा प्रताप आणि मुघल सम्राट अकबराचे प्रतिनिधित्व करणारे आमेरचे राजा मानसिंग यांच्या सैन्यात हे प्रसिद्ध युद्ध झाले होते.

‘इतिहासकारांनी चुकीचा इतिहास मांडला’ – मोहन भागवत

हल्दीघाटीच्या लढाईत महाराणा प्रतापांचा विजय ‘निसंदिग्ध’ होता, असे सांगत मोहन भागवत म्हणाले की, आपल्या देशातील इतिहासकारांनी नेहमीच आक्रमकांना झुकते माप दिले आणि स्थानिक योद्ध्यांच्या पराक्रमाकडे दुर्लक्ष केले.

“हल्दीघाटीच्याच्या लढाईत महाराणा प्रताप आणि भारताच्या बाजूने लढणाऱ्यांचाच विजय झाला होता, हे अगदी स्पष्ट आहे. इतिहासातील चर्चा आणि मांडणी नेहमीच एकांगी व पूर्वग्रहदूषित राहिली आहे, परंतु वास्तव या कथित मांडणीच्या पूर्णपणे विरुद्ध आहे,” असा दावा भागवत यांनी केला.

आपल्या विधानाच्या समर्थनार्थ त्यांनी मुघलकालीन इतिहासकारांच्याच नोंदींचा हवाला दिला. “स्वतः मुघल इतिहासकारांनी जे लिहून ठेवले आहे ते वाचल्यास समजते की, राजपूत सैन्याच्या पहिल्याच हल्ल्यात मुघल सैन्याला माघार घ्यावी लागली होती. ते तब्बल ६ ते ७ मैल मागे पळाले होते. मग विजय कोणाचा झाला? चुकीचा इतिहास लिहिणारे इतिहासकार त्या काळातही अस्तित्वात होते,” असा टोलाही त्यांनी लगावला.

इतिहासकारांचे मत काय?

बहुतांश आधुनिक इतिहासकारांच्या मते, हल्दीघाटीची लढाई ही मुघलांसाठी एक ‘धोरणात्मक विजय’ होती. तर काहींच्या मते, ही लढाई अनिर्णित राहिली होती. कारण, मुघल सैन्याला ना महाराणा प्रतापांना बंदी बनवता आले, ना मेवाडवर पूर्णपणे ताबा मिळवता आला.

पाठ्यपुस्तकांतील बदल आणि वाद

यापूर्वी २०१७ मध्ये राजस्थानमधील शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये बदल करण्यात आला होता. सुमारे ४५० वर्षांपूर्वी झालेल्या हल्दीघाटीच्या युद्धात राजपूत योद्धा महाराणा प्रतापांनी मुघल सम्राट अकबराच्या सैन्याचा पराभव केला होता, अशी नोंद या पुस्तकांमध्ये करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी अनेक विद्वानांनी या दाव्यावर आक्षेप घेतला होता. महाराणा प्रतापांनी रणनीतीचा भाग म्हणून रणांगणातून माघार घेतली होती आणि त्यानंतर अनेक वर्षे मुघलांविरुद्ध ‘गनिमी कावा’ पद्धतीचा वापर करून संघर्ष सुरू ठेवला होता, असे या अभ्यासकांचे म्हणणे आहे.

इतिहासकारांमध्ये मतभिन्नता

उदयपूरच्या मोहनलाल सुखाडिया विद्यापीठातील इतिहास विभागाचे निवृत्त प्राध्यापक के. एस. गुप्ता यांनी तत्कालीन पर्शियन आणि राजस्थानी दस्तऐवजांचा अभ्यास करून सांगितले होते की, महाराणा प्रतापांचा पराभव झाला होता हा दावा चुकीचा आहे.

दुसरीकडे, राजस्थानमधीलच अनेक ज्येष्ठ इतिहासकारांनी या निष्कर्षाशी असहमती दर्शवली आहे.

  • रिमा हुजा (लेखिका – हिस्टरी ऑफ राजस्थान): “जर मुघल ही लढाई हरले असते, तर त्यांनी तो परिसर सोडायला हवा होता. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, मुघल सैन्याने अनेक वर्षे तिथला तळ सोडला नाही आणि प्रतापांनीही आपला लढा कधी थांबवला नाही.”
  • प्रा. के. जी. शर्मा (माजी प्रमुख, इतिहास विभाग, राजस्थान विद्यापीठ): “युद्धात सुरुवातीला राजपुतांचे पारडे जड होते. मात्र, त्यानंतर मुघल सम्राट अकबर स्वतः मोठ्या सैन्यासह युद्धभूमीत उतरत असल्याची अफवा पसरली. या अफवेमुळे रणनीतीचा भाग म्हणून महाराणा प्रताप आणि त्यांच्या सैन्याला डोंगराळ भागात माघार घ्यावी लागली.”

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या या विधानामुळे आता हल्दीघाटीच्या युद्धाच्या इतिहासाची पाने पुन्हा एकदा उलटली जात असून, राजकीय आणि सामाजिक वर्तुळात यावर जोरदार खल सुरू झाला आहे.