CoronaVirus : देशातील एकूण मृत्यूंपैकी निम्मे मागील पंधरा दिवसांत

मागील चोवीस तासांत देशभरात २८७ जणांचा करोनामुळे मृत्यू झालेला आहे.

संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र

देशात मार्च महिन्याच्या मध्यात करोनामुळे झालेल्या पहिल्या मृत्यूपासून ते आजतागायत सात आठवड्यांच्या कालावधीत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ६ हजार ९२९ वर गेलेली आहे. यातील जवळपास निम्मे (३ हजार ५९) मृत्यू हे मागील पंधरवड्यात झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

करोना हॉटस्पॉट ठरलेल्या २६ जिल्ह्यांमध्ये यातील ८० टक्के मृत्यू आहेत. मागील दोन आठवड्यात मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, ठाणे, पुणे आणि चेन्नई या जिल्ह्यांमध्ये १०० पेक्षा जास्त मृत्यू झालेले आहेत. या कालावधीमध्ये मृत्यू झालेल्या एकूण ४ हजार ०५५ मृत्यूंपैकी, या ठिकाणी १ हजार ९६४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

मात्र भारताचा मृत्यूदर अद्याप कमी म्हणजेच २.८ टक्के आहे. तर जागतिक मृत्यू दर हा ५.८ टक्के असून, अमेरिका-५.७ टक्के, ब्राझिल-५.५ टक्के तर रशियाचा मृत्यू दर १.२ टक्के आहे. करोनाबाधितांची संख्या व मृत्यू हे कायम असून, यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. मागील पंधरा दिवसात करोना हॉस्पॉट ठरलेल्या जिल्ह्यांमध्ये किमान एक अधिक मृत्यूची नोंद होत आहे.

उत्तर प्रदेशमध्ये १८ आणि बिहारमध्ये १३ असे नवीन जिल्हे आहेत जेथे पहिल्यांदाच करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये करोना मोठ्या प्रमाणवर पसरत असल्याचे दिसत आहे. तसेच, देशात ७३६ जिल्ह्यांपैकी जवळपास ७०० जिल्हे असे आहेत की ज्या ठिकाणी करोनाचा एकतरी रुग्ण आहे. २२ मे पर्यंत ही संख्या ६३० होती. त्यानंतर देशाने नॉन कंटेनमेंट झोनमध्ये शिथीलता देत लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात प्रवेश केला.

मागील २४ तासांत देशभरात आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजेच ९ हजार ९७१ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर २८७ जणांचा करोनाने बळी घेतला आहे. देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता २ लाख ४६ हजार ६२८ वर पोहचली आहे. भारतामध्ये करोनामुळे ६ हजार ९२९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Half of covid deaths in last fortnight msr