BJP slams Hamid Ansari on Ghazni and Lodhi were Indian looters remark : माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी केलेल्या एका विधानामुळे एक नवा वाद पेटल्याचे पाहायला मिळत आहे. अन्सारी यांनी गझनी आणि लोधी यांसारखे मध्ययुगीन राज्यकर्ते हे ‘परकीय आक्रमक’ नव्हते, असे विधान केले आहे. इतकेच नाही तर हे सर्व भारतीय होते असेही हमीद अन्सारी म्हणाले आहेत. यानंतर आता भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप करणाऱ्या काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.
भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, हे फक्त एक विधाना नसून एका विशिष्ट विचारसरणीचा भाग आहे असे म्हटले आहे. भारताच्या मध्ययुगीन काळातील इतिहास बदलण्याचा हा एक प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
“पुन्हा एकदा हमीद अन्सारी आणि काँग्रेस इकोसिस्टम गझनी गँगप्रमाणे काम करत, गझनीचे गौरवीकरण करत आहोत. तोच गझनी जाने सोमनाथ मंदिर फोडण्याची हिंमत केली. तसे तर काँग्रेस पक्ष सोमनाथ मंदिराचा विरोध करतेच, त्यांची इकोसिस्टम देखील कधी शरजील इमाम आणि उमर खालिद यांना जोश वाले युवा म्हणतात आणि आता म्हणतात की गझनी तर गझनी भारतीय होता, त्याला परकीय का म्हटले जाते, यातून दिसून येते की हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या लोकांचे गौरवीकरण करण्याचे काम काँग्रस आणि त्यांची इकोसिस्टम करते,” असे पूनावाला म्हणाले.
हमीद अन्सारी काय म्हणाले होते?
पूनावाला यांनी हमीद अन्सारी यांच्या एका मुलाखतीमधील १८ सेकंदांची एक व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे. ज्यामध्ये अन्सारी गझनी आणि लोधी यांच्याबद्दल बोलताना दिसत आहेत. “लोधी, गझनी हे सर्व भारतीय लुटारू होते. हे बाहेरून आलेले नव्हते. राजकीयदृष्ट्या सोयीचे आहे की, त्यांनी हे तोडले, ते तोडले. ते सर्व भारतीय होते,” असे हमीद अन्सारी म्हणाले.

