Andhra Pradesh CM Naidu in science conclave: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री ए. चंद्राबाबू नायडू यांनी तिरुपती येथे झालेल्या विज्ञान परिषदेत भारताच्या पुराणातील महनीय व्यक्ती या हॉलिवूडच्या सुपरहिरोंपेक्षा खूप मोठ्या असल्याचे म्हटले आहे. तरूणांनी भगवान राम, श्रीकृष्ण आणि रामराज्याबद्दल शिकले पाहिजे, असेही ते म्हणाले.

तिरुपती येथे राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठात भारतीय विज्ञान संमेलनाच्या (BVS) उदघाटन सत्रात बोलताना नायडू म्हणाले, “भगवान हनुमानाची शक्ती सुपरमॅनपेक्षाही जास्त आहे. अर्जुन आयर्न मॅन किंवा बॅटमॅनपेक्षाही मोठा योद्धा होता.”

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री नायडू हे माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेची भलामन करणारे नेते म्हणून ओळखले जातात. अलीकडेच त्यांनी क्वांटम तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रीत केले आहे. विज्ञान परिषदेत बोलत असताना त्यांनी पालक, शिक्षक आणि समाजाला आवाहन करताना म्हटले की, मुले आणि तरुणांना पाश्चात्य सुपरहिरोंपुरते मर्यादित न ठेवता त्यांना भारतातील महाकाव्ये आणि सांस्कृतिक वारशाचे ज्ञान द्यावे. ते म्हणाले, भारतातील पौराणिक नायक स्पायडर मॅन, बॅटमॅन किंवा सुपरमॅन सारख्या काल्पनिक पात्रांपेक्षा अधिक शक्ती आणि आदर्शांचे प्रतीक आहेत.

“भगवान राम हे सदाचाराचे तर राम राज्य हे आदर्श शासनाचे सर्वोच्च प्रतीक आहे”, असेही मुख्यमंत्री नायडू म्हणाले. त्यांनी उपस्थितांना आवाहन केले की, आपल्या मुलांना हिंदू देवता भगवान श्रीकृष्ण आणि भगवान शिव यांची महती शिकवावी. तसेच महाभारत आणि रामायणामधील महत्त्वाचे धडे द्यावेत. तसेच आपली महाकाव्ये अवतार सारख्या चित्रपटांपेक्षाही अधिक गहन आहेत, असेही ते म्हणाले.

बकासुर, कंस यांच्या कथा सांगा

मुख्यमंत्री नायडू पुढे म्हणाले, बकासुर आणि कंस यासारख्या पात्रांच्या कंथाद्वारे मुलांना चांगले आणि वाईट यातला फरक शिकवता येऊ शकतो. तसेच आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांनी चित्रपट आणि राजकारणात काम करताना चांगली मूल्ये जपल्याची आठवण नायडू यांनी करून दिली. एनटी रामाराव यांनीही पौराणिक कथा लोकांपर्यंत पोहोचवल्या होत्या, असे असे ते म्हणाले.

अटलबिहारी वाजपेयी आणि पंतप्रधान मोदींचे कौतुक

मुख्यमंत्री नायडू यांनी राष्ट्रीय विकासावरही भाष्य केले. ते म्हणाले, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी भारताच्या विकासाचा पाय रचला आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावर कळस चढवला.