“माझा मृत्यू झाला असता तर बरं झालं असतं, अशा वेदना कोणालाही असह्य होतील, पण मी आता इतकी भाजलीये की किमान कोणी माझ्यावर बलात्कार तर करणार नाही’…दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरु असलेली बलात्कार पीडित महिला तिची व्यथा मांडत होती. पीडित महिलेला तिच्या वडिलांनी१० हजार रुपयांसाठी विकल्याचे उघड झाले असून अत्याचार असह्य झाल्याने पीडितेने स्वत:ला जाळून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.

दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या २३ वर्षीय बलात्कार पीडित महिलेने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला गेल्या १० वर्षांमध्ये ती कोणत्या परिस्थितीला सामोरे गेली, हे सांगितले. पीडित महिलेने २८ एप्रिल रोजी उत्तर प्रदेशमध्ये मित्राच्या घरी स्वत:ला जाळून घेतले. ती ७५ ते ८० टक्के भाजली असून ती वेदनेने विव्हळत होती. पीडिता सांगते, २००९ मध्ये मी १४ वर्षांची असतानाच वडिलांनी माझे पहिले लग्न लावून दिले. माझे पती माझ्या पेक्षा वयाने खूप मोठे होते आणि काही महिन्यांमध्येच त्यांनी मला सोडून दिले.

यानंतर काही महिन्यांमध्येच माझ्या वडिलांनी मला १० हजार रुपयांपायी विकले. माझा दुसरा पती क्रूर होता. तो माझ्यावर बलात्कार करायचा, त्याच्या मित्रांसोबत मला शरीरसंबंध ठेवण्यासाठी भाग पाडायचा. २० हून अधिक पुरुषांनी माझ्यावर बलात्कार केला आणि मला ठार मारण्याची धमकीही दिली, असे पीडित महिला रडत रडत सांगत होती.

मला कधीच न्याय मिळाला नाही. मी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला, पण मला कोणीही दाद दिली नाही. वडिलांनीही माझ्याकडे दुर्लक्ष केले. अत्याचार सहन करुन मी थकले होते आणि शेवटी मी आत्महत्येचा निर्णय घेतला, असे पीडितेने सांगितले. सध्या पीडितेची प्रकृती गंभीर असून तिला मानसिक धक्का बसला आहे.