एक्स्प्रेस वृत्त
नवी दिल्ली : ‘जेफ, ‘गुडी, गुडी’ (साळसूदपणा) फार न करता इंटरनेटवर आधारित उद्योगांच्या कल्पनांकडे लक्ष देण्याची तुमची सूचना पटली आहे. मी तयार आहे,’ हरदीपसिंग पुरी यांनी अमेरिकी उद्योजक आणि बाललैंगिक प्रकरणातील गुन्हेगार जेफ्री एप्स्टाईन आणि ‘लिंक्ड्-इन’चे सहसंस्थापक रीड हॉफमन यांना १३ नोव्हेंबर २०१४ रोजी लिहिलेल्या ई-मेलमधील हे शब्द आहेत. यावर पुरी याला तयार होतील, याची खात्री असल्याची भावना एप्स्टाईनने व्यक्त केली आहे.
या ई-मेलपूर्वी २ ऑक्टोबर २०१४ रोजी हॉफमन यांनी एप्स्टाईनच्या ई-मेलला प्रत्युत्तर दिले होते. ‘हरदीप तुला उपयुक्त वाटले का,’ या एप्स्टाईनच्या प्रश्नाला हॉफमननी ‘गुंतागुंतीचे आहे’ असे उत्तर दिले. त्यांच्यातील पुढील संभाषण ‘स्काईप’वर झाले. २४ ऑक्टोबर २०१४ रोजी पुरी यांच्या आणखी एका ई-मेलवरून त्यांनी एप्स्टाईनच्या सहायकाला भारतामधील लग्नसमारंभाला उपस्थित राहता यावे, यासाठी तत्काळ व्हिसा मिळविण्यात मदत केली होती.
वर्षभरानंतर, डिसेंबर २०१५ मध्ये एप्स्टाईनने पुरी यांचा ‘कॉफीसाठी वेळ मिळेल का,’ असे विचारणारा ई-मेल नोर्वेच्या तेर्जे रॉड-लार्सन या राजनैतिक अधिकाऱ्यांना फॉरवर्ड केला होता. त्याला उत्तर देताना रॉड-लार्सन यांनी ‘तू ती म्हण ऐकली आहेस का : जेव्हा तू एखाद्या भारतीयाला आणि सापाला भेटशील, तेव्हा भारतीयाला प्रथम मार!’ त्यावर एप्स्टाईनने उत्तर दिले, की ‘प्रश्न हा आहे, की दोघांमधला फरक कसा ओळखायचा?’
अमेरिकेच्या न्याय विभागाने ३० जानेवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या एप्स्टाईन प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांत केंद्रीय मंत्री पुरी यांचा उल्लेख आढळतो. २०१४ मध्ये ते राजनैतिक अधिकारी म्हणून निवृत्त झाले होते. नंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. एप्स्टाईनशी २०१४-१५ मध्ये ई-मेलवरून केलेल्या संवादात त्यांनी प्रामुख्याने भारताच्या आर्थिक विकासाचा मुद्दा मांडला होता. अमेरिकेने जाहीर केलेल्या कागदपत्रांनुसार, या ई-मेलमध्ये एप्स्टाईनने पुरी यांना १८ जून २०१४ रोजी लिहिले, ‘रीड हॉफमन भारतात येण्यासाठी तयार आहेत.’ पुरी यांनी २३ जून रोजी प्रत्युत्तर दिले, की ‘जेफ्री, तुमचा मेसेज आत्ता दिल्लीत आल्यानंतर पाहिला. रीड हॉफमन यांच्या भेटीदरम्यान त्यांना मदत करण्यात आनंद होईल.’ सप्टेंबर २०१४ मध्ये एप्स्टाईनने ई-मेलमधून पुरी यांची ओळख हॉफमनना करून दिली. ‘रीड–हरदीप. हरदीप–रीड. रीड, हरदीप हा तुझा भारतातील हक्काचा माणूस आहे.’
ऑक्टोबर २०१४ मध्ये हॉफमनबरोबर झालेल्या त्या ‘गुंतागुंतीच्या’ भेटीनंतर एका महिन्याने, पुरी यांनी एप्स्टाईनला लिहिले: ‘जेफ, ३ ऑक्टोबर रोजी सिलिकॉन व्हॅलीमध्ये रीडबरोबर झालेल्या चर्चेची तुला माहिती दिली होती. त्यावर रीडने शक्य तितक्या लवकर भारताला भेट द्यायला हवी, अशी तुझी प्रतिक्रिया होती. ऑक्टोबरच्या मध्यापासून मी पुन्हा भारतात आलो आहे. माझी आता पूर्वीपेक्षा अधिक खात्री झाली आहे की, आजचा भारत इंटरनेटवर आधारित आर्थिक व्यवहारांसाठी एक मोठी संधी उपलब्ध करून देत आहे.’
संसदेत गदारोळ, पुरींचे स्पष्टीकरण
– पुरी यांच्या या ई-मेलवरून बुधवारी संसदेत गदारोळ झाला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या ई-मेलचा संदर्भ देऊन प्रश्न उपस्थित केले. त्यांना प्रत्युत्तर देताना पुरी यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी निराधार आरोप करीत असल्याचे स्पष्टीकरण दिले.
– पुरी यांनी सांगितले, की संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे राजदूत मे २००९ मध्ये रुजू झाल्यापासून २०१७ मध्ये मंत्री होईपर्यंत आठ वर्षे ते अमेरिकेमध्ये होते. ते म्हणाले, ‘या आठ वर्षांत दोन ते तीन भेटींचे संदर्भ असण्याची शक्यता आहे. ‘संयुक्त राष्ट्रांच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘यूएन’ आपल्या उद्दिष्टांसाठी सक्षम आहे की नाही, हे पाहण्यासाठी आंतरराष्ट्रीय शांतता संस्थेत (आयपीआय) एका प्रकल्पांतर्गत आयोग स्थापन करण्यात आला होता… त्याचे अध्यक्ष ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान होते…
– ‘आयपीआय’मधील माझे वरिष्ठ तेर्जे रॉड-लार्सन, हे एपस्टाईनला ओळखत होते. ‘आयपीआय’ किंवा ‘आयसीएम’च्या शिष्टमंडळाचा भाग म्हणूनच एपस्टाईनला काही प्रसंगी भेटलो होतो. या भेटी तीन किंवा जास्तीत जास्त चार वेळा झाल्या होत्या.’
‘तू परत आल्यावर मला कळव…’
डिसेंबर २०१४ मध्ये पुरी यांनी एप्स्टाईनला भेटीसाठी ई-मेल लिहिला. त्यामध्ये त्यांनी एप्स्टाईनला विचारले, की तो त्याच्या ‘एक्झॉटिक आयलंड’वरून (exotic island – विलक्षण किंवा आकर्षक बेट) कधी परतणार आहे, जेणेकरून ते ‘गप्पा मारण्यासाठी भेटू’ शकतील. एप्स्टाईनने तत्काळ प्रतिसाद दिला : ‘मी तुलाच लिहित होतो. आश्चर्यकारक आहे. माझे रीडशी बोलणे झाले आहे.’ त्यावर पुरी यांनी उत्तर दिले : ‘खरोखरच, ही टेलिपॅथी आहे. तू परत आल्यावर मला कळव आणि मजा कर. तसेही, तुला त्यासाठी इतरांच्या प्रोत्साहनाची गरज नाहीच.’
