सुरतमध्ये देशद्रोहाचा ठेवण्यात आलेला आरोप रद्दबातल करावा, या मागणीसाठी गुजरातमधील पटेल आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याने गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
हार्दिकचे वडील भरत पटेल यांनी पुत्राच्या वतीने याचिका दाखल केली आहे. हार्दिकने कोणताही गुन्हा केला नसल्याचे म्हटले आहे. हार्दिकने जे वक्तव्य केले त्यावरून कोणताही गुन्हा सिद्ध होत नाही, त्यामुळे त्याने कोणताही गुन्हा केलेला नाही, असे याचिकेत म्हटले आहे. या याचिकेवर बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. आत्महत्या करण्याऐवजी पोलिसांना ठार मारा, असे वक्तव्य हार्दिक पटेलने करून समाजातील युवकांना चिथावणी देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्याच्याविरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला
आहे.
राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याबद्दल राजकोट ग्रामीण पोलिसांनी सोमवारी हार्दिक पटेल याला अटक केली.हार्दिक याची जामिनावर सुटका होताच सुरत पोलिसांनी त्याला देशद्रोहाच्या तक्रारीवरून अटक केली.